कोल्हापूर: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलिस स्टेशनमध्ये नोंदविला आहे. सांगली जिल्ह्यातून विनापरवाना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमध्ये आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना विषाणुच्या प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार 60 वर्षावरील नागरिकांना जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी विनाकारण फिरता येणार नाही. अथवा कोणीही विनापरवाना जिल्ह्यात दाखल होणार नाही, असे आदेश दिले होते.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोणातून कोणतीही खबरदारी घेतली नाही. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लगंन केल्याप्रकरणी जयसिंगपुर पोलिसांनी त्यांना सांगली रोडवरील उदगाव टोल नाक्यावर रोखुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.