पिंपरी- भटक्या कुत्र्यास दुचाकीला बांधून फरपटत नेऊन त्यास ठार मारले. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी येथे मंगळवारी (दि. ५) रात्री घडली.
बंटी फुगे (वय २५, रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. डॉ. हिना सलीम नायकुडे (वय २७, रा. द्वारका राजपार्क, पिंपळे सौदागर) यांनी बुधवारी (दि. ६) याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी बंटी फुगे यांने कासारवाडी परिसरात भटकत राहणाऱ्या कुत्र्याच्या गळ्यात नायलॉन व कापडी दोरी बांधली. त्यास दुचाकीच्या पाठीमागे बांधून स्मशानभूमीपासून ते किनारा हॉटेलपर्यंत फरफटत नेऊन ठार मारले. पोलीस हवालदार डबीर याबाबत अधिक तपास करीत आहेत.