मुंबई – कालीचरण महाराज हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, आता आणखी एका वादग्रस्त विधान करून कालिचरण चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे रविवारी 9 एप्रिल रोजी राम नवमी निमित्त आयोजित धर्मसभेत चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राम नवमी निमित्त धर्मासभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून कालीचरण महाराज यांनी भाषण केले होते. यावेळी त्यांनी काही वादग्रस्त विधाने देखील केली होती. आणि याच कारणामुळे बीलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 153 अ, 295 अ आणि 505 – 2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कालिचरण महाराज यांच्या अडचणी आणखी वाढणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी देखील केलं होत वादग्रस्त विधान…
यापूर्वी देखील कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर केला होता. तसेच गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केले होते. याबाबतची एक व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल आहे.