नवी दिल्ली – अमेरिकेतील एका न्यायालयाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली १० कोटी डॉलर म्हणजेच ७३६ कोटी ४७ लाख रुपयांची याचिका फेटाळून लावली आहे.
फुटीतरतावादी काश्मीर-खलिस्तानी गट आणि दोन व्यक्तींनी ही याचिका दाखल केली होती. याचिकाकार्ते या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयाने दिलेल्या तारखांना हजर राहू शकले नाहीत. त्यामुळेच न्यायालयाने ही याचिका रद्द केली आहे. टेक्सासमधील ह्युस्टन येथे १९ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या हाउडी मोदी कार्यक्रमानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती.
भारताने जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्यासंदर्भात संसदेमध्ये घेतलेल्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंह ढिल्लाँ यांच्याकडून नुकसानभरपाई म्हणून १० कोटी डॉलर्सची मागणी केली होती.
ढिल्लाँ हे सध्याचे डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे महानिर्देशक आणि संरक्षण प्रमुखांसाठी (चीफ ऑफ डिफेन्स) ‘इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ’चे उप-प्रमुख आहेत.