मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटणी या दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरून साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम 188, 34 IPC दिनांक 2.6.2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण कमी होत असून अनेक शहर कोरोनामुक्त होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंध हटवण्यात आले आहे. याचा फायदा घेऊन काही जण घराबाहेर पडताना दिसत आहे.
नुकतंच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री दिशा पाटणी आणि त्यांचा ड्रायव्हर या तिघांविरुद्ध वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे वांद्र्यात जिमनंतर ड्राईव्हसाठी गेले होते. त्याचवेळी वांद्र्यातील बँडस्टँड पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पोलिसांनी त्याचे आधार कार्ड, लायसन्स आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. यानंतर त्या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरणे, तसेच साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम 188, 34 IPC दिनांक 2.6.2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी या दोघांना लॉकडाऊन असतानाही फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणे चांगलेच महागात पडले आहे.