बेशिस्तीमुळे वाढली करोनाची धास्ती

सातारा शहरातील परिस्थिती; प्रशासनाकडून कडक उपाययोजनांची गरज

सातारा (प्रतिनिधी) – करोनाचा फैलाव सध्या सातारा शहर व परिसरात वाढत आहे. करोना नियंत्रणात आणण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असताना शहरात मात्र दिवसेंदिवस बेशिस्त वाढली आहे. शहर आणि परिसरातील वाढती गर्दी करोना वाढीला पोषक ठरत आहे. प्रसासनाकडून कडक उपाययोजनांची गरज आहे. सातारा जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा सतराशेकडे गेला आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अशी भयावह परिस्थिती असताना नियम, कायदे धाब्यावर बसवण्यात येत आहेत. परिणामी बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

नागरिक बिनधास्तपणे पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडत आहेत. मॉर्निंग, इव्हीनिग वॉक करणाऱ्यांची आजही सगळीकडे रिघ लागल्याचे दिसत आहे. आडबाजूला असणारी हॉटेल्स, ढाबे बिनधास्त सुरू आहेत. पोलीस कारवाई सुरू असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील पासिंगच्या गाड्या प्रत्येक वॉर्डात दिसत आहेत. शहरातील वॉर्ड समितीचे सदस्य ही बाब गंभीरपणे घेत नसल्याचे यातून दिसून येते. आजही लोक समूहाने वावरताना दिसत आहेत. शहरात दररोज कोणी ना कोणी बाधित सापडत असला तरी कोणाला याची धास्ती नसल्याचे दिसून येते. शहरातील मोक्‍याच्या ठिकाणी सायंकाळी गर्दी दिसते. शहरालगत असलेल्या उपनगरात तर नियमांचे तीन तेरा वाजले आहेत.

शहरात 20 प्रभागात 40 वॉर्ड आहेत. या ठिकाणी दक्षता कमिट्या केल्या आहेत. या कमिट्यातले सदस्य कोठे असतात?, शहरात वॉर्डात बाहेरून कोण आले याची त्यांना कसलीही कल्पना नसते. बाधित रुग्ण आढळला की पळापळ सुरू होते. या दक्षता कमिटीच्या सदस्यांना कारवाईचे अधिकार दिले गेलेत, परंतु कोणत्याही समितीच्या सदस्यांनी आजपर्यंत बाहेरून आलेल्या व नियम मोडणाऱ्या कोणावर कारवाई केल्याचे कोठे नमूद नाही. त्यामुळे सातारा शहरातील दक्षता समित्या डाराडूर असल्याचे दिसत आहे.भाजी विक्रीची ठिकाणे, पेट्रोल पंप, कपड्याची दुकाने आदी ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण आणले नाही तर आगामी काळात करोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होण्याचा धोका संभवत आहे. नागरिकांनी प्रसासनाकडून दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. मात्र 80 टक्केच लोक सूचना पाळत आहेत. उर्वरित 20 टक्के लोकांमुळे करोना वाढू नये याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

पोलीस कारवाई थंडावली
सातारा जिल्ह्याच्या सर्व सीमा सील आहेत. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात अन्य जिल्ह्यातून नागरिक जिल्ह्यात आले. सकाळी 9 ते 2 या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. सातारकर मोकाटपणे फिरत आहेत. त्यांच्यावर कडक लॉकडाऊनमध्ये कारवाई केली जात होती तशी पुन्हा सातारा पोलिसांनी करणे गरजेचे आहे. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता नियम, कायदे मोडणारांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र सध्या तरी कारवाया थंडावल्या असल्याचे दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.