संतोष पवार
सातारा – सातारा जिल्ह्यात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून आतापर्यंत सहा जण बाधित आढळले आहेत. करोनाने एका वृध्दाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने वारंवार विनवण्या करुनही सातारकर सोशल डिस्टंन्सिंग पाळत नाहीत. लॉकडाऊन, संचारबंदी असतानाही सातारकरांकडून होत असलेल्या बेफिकिरीमुळे करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. सातारकरांनी वेळीच सावध होवून आयुष्य एकदाच आहे याचा विचार करुन घरातच थांबून प्रशासनाच्या प्रयत्नांना बळ देण्याची गरज आहे.
प्रशासनाच्या प्रयत्नांना हवीय साथ
करोना विषाणूचा फैलाव सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी जिल्हावासियांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करुन घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला तर आपल्या व कुटुंबीयांच्या जीवावर आलेले संकट आपण परतावून लावू शकतो. त्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे.