पुणे – पुणे विमानतळाहून कार्गो सेवा सुरू होणे महत्त्वाचे आहे. यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. यासाठीची जागा घेणे, हवाईदलाबरोबर बैठका सुरू आहेत.
कार्गोचे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे. यामुळे पुण्याच्या उद्योग व्यवसायालादेखील चालना मिळणार आहे, असे मत खासदार आणि विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष गिरिष बापट यांनी व्यक्त केले.
विमानतळ सल्लागार समितीची मंगळवारी बैठक झाली. सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणच्या नागरिकांना देखील पुणे विमानतळावर येणे सोयीचे आहे. यामुळे कार्गोवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यासाठीची जागा हवाईदलाकडून ताब्यात घेण्यात येणार आहे.
यासाठी दिल्लीमध्ये बैठकादेखील सुरू आहेत. याचे काम आम्ही वेगाने करण्याकडे लक्ष देणार आहोत. येत्या काळात पुण्यात करोनाची लस तयार झाल्यानंतर, लस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कार्गो सेवा फायदेशीर ठरणार असल्याचे बापट यांनी सांगितले.
नवीन टर्मिनलचे काम जून 2022 पर्यंत अपेक्षित
विमानतळाच्या आवारात नवीन टर्मिनल बांधण्यात येत आहे. याचे काम सुरू असून, ते जून 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या टर्मिनलमुळे विमानांसाठी अधिकची जागा उपलब्ध होणार आहे. याशिवाय, विमान उड्डाणे आणि विमानतळाची सेवा दुपटीने वाढवता येणार आहे.