सांभाळा यकृताचे आरोग्य (भाग-२)

डॉ. अमित गुप्ते 
दरवर्षी 28 जुलै हा दिवस वर्ल्ड हिपॅटिटीस डे म्हणून जगभर साजरा केला जातो. आजच्या बदलत्या काळात समाजात व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असताना आणि जास्तीतजास्त युवा पिढी विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याचे दिसत असताना, यकृत विकारांविषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. 
मुंबईतील रिजनरेटिव्ह मेडिसीन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन म्हणतात, यकृताचा बहुतेक भाग हा यकृताच्या पेशींपासून तयार झालेला असतो. त्याला हेपॅटोसाइट्‌स म्हणतात. या पेशींचे सरासरी आयुर्मान 150 दिवसांचे असते. याचा अर्थ हा की यकृत नियमितपणे स्वत:ची पुनर्निर्मिती करत असते. हा एकमेव अवयव असता आहे ज्याची पुनर्निर्मिती होऊ शकते. यकृताच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढू लागले आहे. यात कर्करोग पसरून यकृतापर्यंत पोहोचण्याऐवजी त्याची सुरुवातच यकृतापासून होऊ लागली आहे. याचा संबंध हेपटायटिस सी या विषाणूच्या संसगार्शी आहे.
या विषाणूमुळे यकृताचा दाह होतो. हेपॅटायटिस सी या विषाणूची वाढ हळूहळू होत असल्याने, ज्यांना आता कर्करोग झाला आहे त्यांना हेपॅटायटिस विषाणूचा संसर्ग 20, 30 किंवा 40 वर्षांपूर्वी झालेला असतो.
यकृतातील मेदाचे प्रमाण वाढते आहे 
सध्याच्या स्पर्धात्मक युगात अनेक जण आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या आजारांबरोबरच अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे 100 पैकी 20 ते 40 जणांच्या यकृतातील मेदाचे (फॅटी लिव्हर) प्रमाण वाढत आहे. तसेच शहरी जीवनशैलीमुळे लहान वयातच जवळपास 35 टक्के मुलांत लठ्ठपणा वाढत असल्याचे दिसून येत असल्याने तरुण वयात यकृतातील मेदाचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्‍टरांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
भारतात दरवर्षी 2 लाख लोक यकृत निकामी झाल्यामुळे मृत्यू पावतात. केवळ मद्यपानामुळे यकृत खराब होत नाही तर जीवनशैलीही निगडित आजार, अनुवंशिकता यामुळेही यकृतातील मेदाचे प्रमाण वाढते आहे. यापैकी जवळपास 60 टक्‍के एनएएफएलडी (नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हर डिसिज) तर 40 टक्‍के दारू चे व्यसन असल्यामुळे यकृतात मेदाचे प्रमाण वाढत आहे.
हेपॅटायटीस बी करता उपलब्ध असलेली लस आणि हेपॅटायटीस बी व सी करता केले जाणारे परिणामकारक औषधोपचारांमुळे यकृत निकामी होण्याच्या घटना कमी होऊ लागल्या आहेत, परंतु अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारांमुळे कर्करोगही होण्याची शक्‍यता असते. यकृताच्या कर्करोगामुळे होणा-या मृतांच्या आकडयातही वाढ होते आहे.
यकृत हा मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, परंतु 50 टक्के समस्या या यकृतात मेदाचे प्रमाण वाढल्यामुळे निर्माण होतात. त्यामुळे अनेकदा यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते. याशिवाय हेपॅटायटीस बी किंवा सी यापेक्षाही यकृतात मेदाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने मधुमेहानंतर भारतात यकृताचा आजार 9 व्या स्थानावर आहे.
तरुणांत यकृत निकामी होण्याचे प्रमाण अधिक 
दारू शरीराला हानिकारक असतानाही जगातील सर्वच देशांत तरुणांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत दारू पिणा-यांचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 2014 मध्ये भारतात 33 लाख लोकांचा मृत्यू दारूमुळे झाला होता. तर 15-20 वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूसाठी दारू हेच प्रमुख कारण होते.
दारूचे सेवन केल्यामुळे यकृतात चरबीचे प्रमाण वाढत राहिल्यामुळे यकृत निकामी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दारू पिण्याचे सरासरी वय भारतात 27 वर्षे होते, मात्र सध्याच्या बदलत्या युगात 17 वर्षातील तरुणही बिनधास्त दारूच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे तरुणांत यकृत निकामी होण्याची भीती अधिक प्रमाणात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात 60 कोटी लिटर मद्यनिर्मिती केली जाते व तेवढीच खपवलीसुद्धा जाते. त्यामुळे आज कोणत्याही खासगी किंवा सरकारी रुग्णालयात जा; तेथे 10 ते 12 टक्के रुग्ण हे यकृत निकामी झाल्याने त्रस्त आहेत. त्यामुळे दारूचा प्रसार आणि प्रचार रोखण्यासाठी राज्य स्तरावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)