सावधान! कागदपत्र देताय?

फसवणुकीचे प्रकार वाढले : परस्परच काढली जाताहेत कर्ज

– संदीप घिसे

पिंपरी – आपले आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, लाइट बिल, मिळकतकराची पावती ही कागदपत्रे अत्यंत महत्वाची आहेत. या कागदपत्रांच्या झेरॉक्‍स इतरांना देताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास आपली मोठी फसवणूक होऊ शकते. शहरात नुकतेच याबाबतचे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिक घरी निवांत असतात आणि त्यांच्या नावे कर्ज काढून त्यांना “डिफॉल्टर’ बनविले जाते. यामुळे कोणतेही कर्ज न घेणाऱ्या व्यक्‍तीचे देखील “सिबिल’ रेकॉर्ड खराब होते आणि भविष्यात त्यांना कोणतेही कर्ज मिळत नाही.

आपली महत्वाची कागदपत्रे देताना ती विश्‍वासू व्यक्‍तीच्या हाती जात आहेत की नाही हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. वरील दोन्ही घटनांमध्ये फसवणूक झाली असली तरी काही नागरिकांना कर्ज काढल्यामुळे बॅंकेचे हप्ते भरावे लागत आहे. कागदपत्र तुमची होती. त्यामुळे तुम्हाला हप्ते भरावे लागतील, असे कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेकदा आपण एका कारणासाठी एखाद्या व्यक्‍तीला कागदपत्र देतो. तो त्याची झेरॉक्‍स काढून ठेवतो. कालांतराने या कागदपत्रांचा गैरवापर होताना दिसून येतो. यापूर्वी अशाच प्रकारे मोबाइलचे सिमकार्ड देण्यासाठी इतरांच्या कागदपत्रांचा वापर झालेला आहे. मात्र आता कर्ज काढू लागल्याने कागदपत्र कोणाच्या हाती देताना नागरिकांची विचार करण्याची गरज आहे.

तुम्हाला शासनाची पेन्शन मिळवून देतो, असे सांगत भोसरी येथील बचत गटाच्या महिलांची आधारकार्ड, पॅनकार्ड घेतली. काही अर्जांवर स्वाक्षरीही घेतली. त्यानंतर त्या महिलांच्या नावे मोठीमोठी कर्ज काढण्यात आली. याप्रकरणी अरविंद पराते, प्रतिभा पराते आणि रमेश बावणे (सर्व रा. वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवकन्या दळवे यांनी 16 ऑक्‍टोबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोबाइलसाठी कर्ज उपलब्ध करून देतो, असे सांगत राहुल ऊर्फ रजनीकांत आनंद शर्मा (रा. पिंपळे गुरव) या महाठकाने जवळपास 25 ते 30 नागरिकांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे घेतली. त्या कागदपत्रांच्या आधारे महागडे मोबाइल खरेदी केले. मात्र त्याने संबंधित व्यक्‍तींना दिले नाही. अशाप्रकारे त्याने 30 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत नीलेश जाधव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खासगी कंपनीत नोकरी करणारी एक व्यक्‍ती वाहन खरेदीसाठी कर्ज काढायला गेली. त्यावेळी तुमचा ट्रॅक रेकॉर्ड खराब असल्याचे सांगितले. आपण कोणतेही कर्ज काढलेले नसताना रेकॉर्ड खराब कसा झाला, याची माहिती घेतली असता धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. कोणीतरी अज्ञात व्यक्‍तीने त्यांच्या नावावर कर्ज काढले. काही महिन्यांनी कर्ज पूर्ण न भरता थोडे पैसे भरून खाते कर्जाचे खाते बंद केले. या कर्ज प्रकरणात पूर्ण पैसे न भरल्याने ट्रॅक रेकॉर्ड खराब झाला. मात्र कर्ज कोणी काढले. याबाबत आत्तापर्यंत त्या तरुणास माहिती मिळाली नाही. यामुळे तो तरुण आता पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहे.

कागदपत्रे देताना अशी घ्या काळजी
विश्‍वासू ठिकाणी, विश्‍वासू व्यक्‍तीच्या हाती आपली कागदपत्रे द्या
कागदपत्रे देताना त्याचा कशासाठी उपयोग करणार आहात ते लिहा
कागदपत्रे देताना त्यावर स्वाक्षरी आणि दिनांक टाकायला विसरू नका

Leave A Reply

Your email address will not be published.