आवडीच्या क्षेत्रात करियर करा 

मानसी चांदोरीकर 
आपल्या मुलांचा कल काय आहे, ते ओळखूनच त्यांना शिक्षणाच्या वाटा खुल्या करुन देणे आवश्‍यक आहे. “मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली नाही, तेंव्हाच मी ठरवलं की, मुलाला इंजिनिअर करीन…’ हा अत्यंत चुकीचा आणि कालबाह्य दृष्टीकोन पालकांनी त्यागणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा कला क्षेत्रात आवड असलेली मुलं-मुली इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या दडपणाखाली कोमेजून जाताना दिसतात. 
अरविंदला घेऊन त्याचे वडील भेटायला आले. आल्यावर त्यांनी अरविंदबद्दल तक्रार सांगायला सुरुवात केली. अरविंद त्यांचा एकुलता एक मुलगा. सध्या तो इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. “हा आमचा अरविंद. गेली दोन वर्षे हा इंजिनियरिंग शिकतोय. गेली दोन वर्षे हा इंजिनियरिंगच्या पहिल्याच वर्षाला दोनदा नापास झाला. खरं तर खूप हुशार आहे. शाळेत नेहमी चांगल्या टक्‍क्‍यांनी पास व्हायचा; म्हणून आम्ही त्याला इंजिनियरिंगला घातलं. पण हा काही अभ्यासच करत नाही. क्‍लास लावलाय. त्यालाही जात नाही. काय करावं, काही समजत नाही.’
अरविंदच्या बाबांचं हे बोलणं सुरु असताना अरविंद मात्र स्वत:ची मान खाली घालून बसला होता. त्यामुळे काकांना थांबवून अरविंदला बाहेर जाण्यास सांगितले. अरविंद बाहेर जाऊन बसल्यावर पुन्हा काकांशी बोलायला सुरुवात केली.
काकांशी बोलताना प्रथम त्यांची सविस्तर कौटुंबिक माहिती घेतली. अरविंदचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. त्याची आई देखील एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. अरविंद हा त्यांचा एकुलता एक मुलगा. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी अरविंदला शिकवले व इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतली. त्यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेऊन मोठे व्हावे. खूप शिकावे अशी त्यांची इच्छा होती. पण अरविंद मात्र इंजिनियरिंगमध्ये मागे पडत होता. अभ्यास करायला तो तयारच होत नव्हता. त्यामुळे काकांना वाईटही वाटत होतं आणि रागही येत होता असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होत. पण अरविंदशी याबाबत बोलून त्यांची बाजू ऐकून घेणंही खूप महत्त्वाचं होतं. अरविंदबद्दल बोलताना काकांच्या डोळ्यात पाणी येत होतं.
“तुम्हीच समजवा आता त्याला! आम्ही काही बोलायला गेलो की चिडतो; आणि घरातून बाहेर निघून जातो. त्याची आई पण त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. पण तो आईचंही ऐकत नाही आणि माझंही ऐकत नाही. काय करावं आम्हाला समजत नाही. तुम्हीच बोला त्याच्याशी. नुसता चित्र काढत बसलेला असतो.’
एवढं बोलून अरविंदचे वडील अर्थात काका थांबले. काकांचं बोलणं झाल्यावर त्यांना इतर काही महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या ज्यातून अरविंदच्या समस्येचा थोडा अंदाज आला.
त्यानंतर अरविंदला आत बोलवून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित वडील बरोबर असल्यामुळे तो बोलण्यास घाबरत होता. मोकळेपणाने बोलणे त्याला अवघडल्यासारखे होत होते. हे त्याच्या बोलण्यावरून लक्षात येत होते. त्यामुळे पुढील सत्र निश्‍चित करून त्या सत्रास अरविंदला एकट्यास भेटण्यास बोलावले. ठरल्याप्रमाणे अरविंद चार दिवसांनी तो भेटायला आला. यावेळी मात्र तो एकटा असल्याने तो अगदी मोकळेपणाने बोलायला लागला. त्याच्याशी बोलताना अंदाज आल्याप्रमाणेच त्याची समस्या असल्याचे लक्षात आले.
“मॅडम, मला परवाच तुमच्याशी बोलायचं होतं; पण बाबा पुन्हा चिडले असते. म्हणून मी शांत राहिलो. इंजिनियरिंग हे माझं आवडीचं क्षेत्र अजिबात नाही. मला त्या क्षेत्रात काहीही रस नाही. मला त्यातलं काही समजत आणि जमत नाही. खूप प्रयत्न केला मी त्यात अभ्यास करायचा पण मला नाही जमत. मला म्युझिकमध्ये खूप आवड आहे. म्युझिक हेच माझं पहिल्यापासून पॅशन आहे. मला याच क्षेत्रात शिक्षण घेण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा आहे. पण बाबांना ते अजिबात आवडत नाही. मी त्यांना खूप समजावलं पण ते ऐकतच नाहीत.आता मी काय करू? मला नाही इंजिनियरिपंग शिकायचं.’
यानंतर म्हणजेच अरविंदशी आणखी सविस्तर बोलणं झाल्यावर पुढील सत्रात तो व आई-बाबा असे एकत्र सत्र घेण्यात आले.
या सत्रात अरविंदने पुन्हा एकदा त्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर त्याचे वडील सुरुवातीला खूप चिडले. पण या सत्रात झालेली सविस्तर चर्चा, अरविंदचे याबाबतचे ठाम मत, त्यांनी करिअर म्हणून या क्षेत्राची केलेली निवड, त्यामागील विचार, पुढील संधी याबाबत झालेल्या मनमोकळ्या चर्चेनंतर, त्याबाबत केलेल्या मार्गदर्शनानंतर आई-बाबांनी त्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची परवानगी दिली आणि अरविंद खूप खूश झाला व आपल्या क्षेत्रात त्याने चांगली प्रगती केली.
यानिमित्ताने पालकांना सांगावंसं वाटतं की, मुलांन त्यांच्या आवडीचं करिअर निवडू द्या. कोणताही कलाप्रकार अर्थार्जनासाठी आता दुर्लक्षित उरलेला नाही आहे. त्यामुळे “चित्रं काढून कुठं पैसे मिळतात का?’ असे मुलांसमोर कधी म्हणूही नये.
(केसमधील नावे बदलली आहेत.)
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)