नगर -महापालिकेचे सफाई कर्मचारी करोना संसर्ग विषाणूच्या प्रादर्भावातही आपला जीव धोक्यात घालून दैनंदिन सफाईचे काम चोखपणे पार पाडत आहेत. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन नागरिकांचे आरोग्यास महत्व देऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आज आरोग्य दिनानिमित्त प्रभाग क्र.14 मधील सफाई कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोज, साबण, मास्क, हॅण्डवॉश, सॅनिटायझर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तरी प्रत्येकाने सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगरसेवक गणेश भोसले यांनी केले आहे.
आरोग्य दिना निमित्त प्रभाग क्र.14 मधील मनपा सफाई कर्मचाऱ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय कर्डिले, सुरेश पुंड आदी उपस्थित होते.यावेळी भोसले म्हणाले की, मनपा सफाई कर्मचारी दररोज शहराची स्वच्छतेची कामे करत असतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वाट मोलाचा आहे.
तसेच करोना संसर्ग विषाणूच्या संकटकाळात प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा असेही त्यांनी सांगितले.