निगा डोळ्यांची (भाग 1)

नेत्रपेढीचे कार्य

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेत्रदान करावयाच्या कालावधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा उत्तम कालावधी कोणता – तर नेत्रदान मृत्यूनंतर जेवढे लवकर होईल तेवढे उत्तम. साधारणत: मृत्यूनंतर दोन ते चार तासांचे आत शरीराबाहेर काढलेले डोळे नेत्रपेढीत संचय करून ठेवल्यास ते उत्तम राहतात. नेत्रसंचयासाठी 4 अंश से. असे तापमान असावे. निर्जंतुक केलेल्या विशिष्ट बाटल्यांतून ते ठेवावेत. असे डोळे 24 तासांच्या आत कलम करण्यासाठी वापरल्यास शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते. काही तज्ज्ञ 48 तास थांबले तरी चालते असे मानतात. हा काळ कितीही विवाद्य असला तरी संचय केलेले बुबुळ एक आठवड्याच्या आत वापरलेले बरे हे नक्कीच. नेत्रसंचयाच्या बाबतीत काही मुभा असली तरी नेत्रदानाच्या बाबतीत विशिष्ट काळाचे बंधन पाळायलाच हवे.

डोळ्यांचे कार्य

आपण जेव्हा पाहतो तेव्हा नक्‍की काय होते? आपल्या डोळ्यांत बाह्य वस्तू वा दृश्‍यांच्या छोट्या-मोठ्या आकारांच्या प्रतिमा दृष्टिपटलावर पडतात. दृष्टिपटलात या प्रकाशाच्या चेतनेमुळे काही रासायनिक प्रक्रिया घडून येतात व दृक्‌संवेदना तयार होतात. या दृक्‌संवेदना दृष्टितंतूंच्याद्वारे आपल्या मेंदूत पोहोचविल्या जातात. मेंदूत दृष्टिकेंद्र असते तेथे या प्रतिमांचा अर्थ लागतो व आपणास दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या डोळ्यांची ठेवण विशिष्ट कोन साधून व विशिष्ट आंतर राखून असल्यामुळे, प्रत्येक डोळ्यांत उमटलेल्या प्रतिमांत काही प्रमाणात फरक असतो. मात्र, आपल्या मेंदूत एकच योग्य प्रतिमा, तिची लांबी, रुंदी, उंची, खोली, सुलट पार्श्‍वभूमीवरील वस्तू वा दृश्‍ये हे सर्व संदर्भ लक्षात घेऊनच आपणास दृश्‍ये दिसत असतात. या नैसर्गिक शक्‍तीलाच आपण त्रिमित दृष्टी-थ्री डायमेन्शनल व्हीजन असे म्हणतो. याच दुर्बिणीतून दोन्ही डोळ्यांनी पाहिले तरी एकच प्रतिमा दिसू शकणारी क्षमता- बायनाक्‍युलर सिंगल व्हिजन होय.

दृष्टीचे हे विकसन वयाच्या तिसऱ्या ते सहाव्या महिन्यांत होते. यासाठी बालकाच्या डोळ्यांत कोणताही गंभीर नेत्रविकार नसावा. उदा. काचबिंदूचा आजार, बुबुळावरील भूर वा सारा, पापण्यांची कमजोरी, मेंदूतील बिघाड, वगैरे. दृष्टिविकसनासाठी बालकांचे नेत्रारोग्य व डोळ्यांची वाढ संतुलित असली पाहिजे.

आपल्या मेंदूतील सर्वांत मोठे अस्तर म्हणजे आपले दृष्टिपटल अथवा रेटीना (ठशींळपर). हे अस्तर अत्यंत महत्त्वाचे, अत्यंत सूक्ष्म व संवेदनाक्षम असते. दृष्टिपटलाचे आणखी सूक्ष्मतर दहा-बारा उपस्तर असतात. हे स्तर केवळ उच्च दर्जाच्या दुर्बिणीतून दिसू शकतात. या उपस्तरात सूक्ष्म मज्जातंतू विविध आकारांच्या मज्जापेशी, प्रकाशक्षम त्रिकोणी पेशी, दंडागोलाकृती विशिष्ट पेशी, रंगद्रव्ये आणि केशवाहिन्यांचे स्तर असतात. प्रकाशात पेशी उद्दीपीत होऊन त्यात तयार होणाऱ्या विद्युतलहरी मज्जामंतूंच्या मार्गे मेंदूपर्यंत पोहोचतात.

दृष्टिपटलातील या पेशी अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतात. आपल्या एकेका डोळ्यात सुमारे 120 दशलक्ष दंडगोलाकृती पेशी असून, त्रिकोणी पेशींची संख्या सुमारे सहा दशलक्ष असते. त्रिकोणी पेशींमुळे आपणास “रंगज्ञान’ होत असते. शिवाय उजेडात स्पष्ट दिसते. याउलट दंडगोलाकृती पेशी अंधारात किंवा कमी प्रकाशात उत्तेजित होतात. त्यामुळे रात्री कमी उजेडात आपण काही प्रमाणात पाहू शकतो. असे सिद्ध झाले आहे की अ जीवनसत्त्वाच्या व प्रथिनांच्या कमतरतेमुळे या दंडगोलाकृती पेशींवर अनिष्ट परिणाम होऊन रातांधता येते. ज्या बालकांना पुरेसे दूध, फळे, अंडी आदी सकस आहार मिळत नाही, त्यांच्यात “अ’ जीवनसत्त्वाच्या अभावाने नेत्रविकार जडतात.

आपल्या दृष्टिपटलात एक विशिष्ट आकाराचा “ठिपका’ असतो, त्याला पीतबिंदू असे म्हणतात. सुमारे 1 ते 1।। मि. मी. आकाराचा हा ठिपका चमकदार दिसतो. तो डोळ्यांच्या पाठीमागे अगदी मधोमध स्थिरावलेला असतो. आपण पाहात असलेल्या दृश्‍यापासून निघालेले प्रकाशकिरण याच ठिपक्‍यावर केंद्रित होतात. या ठिकाणी त्रिकोणीपेशी बहुतांशाने गोळा झालेल्या असतात. या पेशी प्रकाशाने उत्तेजित होतात व आपणास सुस्पष्ट दिसते. सूर्यग्रहण वा अतिप्रखर ज्योतीकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास पीतबिंदूचा दाह होऊन, दृष्टी अधू होऊ शकते.

पीतबिंदू प्रमाणेच डोळ्यात एक “अंधबिंदू’ देखली असतो. हा अंधबिंदू म्हणजे दृष्टितंतूचे डोके अथवा शिरोभाग होय. दृष्टिपटलाच्या या भागात दृष्टिज्ञान होत नाही म्हणून त्याला “अंधबिंदू’ म्हणतात. विशिष्ट नेत्रविकारात दृष्टितंतूचा आकार वाढतो, त्याला खड्डा पडतो. दृष्टी संकुचित बनते. संततिप्रतिबंधक गोळ्या व मादक द्रव्यांचे सेवन केल्यास दृष्टितंतूचे आजार जडतात, हे लक्षात ठेवावे.

निगा डोळ्यांची (भाग 2)   निगा डोळ्यांची (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)