निगा डोळ्यांची ( भाग 3)

नेत्रपेढीचे कार्य

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेत्रदान करावयाच्या कालावधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा उत्तम कालावधी कोणता – तर नेत्रदान मृत्यूनंतर जेवढे लवकर होईल तेवढे उत्तम. साधारणत: मृत्यूनंतर दोन ते चार तासांचे आत शरीराबाहेर काढलेले डोळे नेत्रपेढीत संचय करून ठेवल्यास ते उत्तम राहतात. नेत्रसंचयासाठी 4 अंश से. असे तापमान असावे. निर्जंतुक केलेल्या विशिष्ट बाटल्यांतून ते ठेवावेत. असे डोळे 24 तासांच्या आत कलम करण्यासाठी वापरल्यास शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते. काही तज्ज्ञ 48 तास थांबले तरी चालते असे मानतात. हा काळ कितीही विवाद्य असला तरी संचय केलेले बुबुळ एक आठवड्याच्या आत वापरलेले बरे हे नक्कीच. नेत्रसंचयाच्या बाबतीत काही मुभा असली तरी नेत्रदानाच्या बाबतीत विशिष्ट काळाचे बंधन पाळायलाच हवे.

डोळे आणि प्रकाश

आपल्या डोळ्यांना प्रकाशाची तीव्रता व प्रखरपणा काही विशिष्ट काळ व विशिष्ट प्रमाणातच सहन होतो. भगभगीत उजेडाचा त्रास वाचविण्यासाठी रंगीत काचांचे चष्मे (गॉगल्स) वापरता येतात. धातू जोडण्याचे काम करणारे कारागीर (वेल्डर्स) सतत प्रखर ज्योतीच्या सान्निध्यात असतात. या ज्योतीत अतिनील किरण असून, ते बुबुळांना व डोळ्यांना घातक ठरतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डोळे लाल होणे, दाह होणे, चुरचुरणे, दृष्टी धूसर बनणे वगैरे उपद्रव या किरणांनी होतात. असा उपद्रव वारंवार झाल्यास बुबुळावर भुरी वा सारा जमा होतो व दृष्टी कायमची मंदावते. या लोकांनी संरक्षक चष्मे वापरणे हितावह ठरते. काही मंडळी उघड्या डोळ्यांनी व जुजबी साधनांनी सूर्यग्रहण पाहतात. सूर्याची किरणे अत्यंत प्रखर व शक्‍तिशाली असतात. या किरणांचा दृष्टिपटलावर अनिष्ट परिणाम होतो व रुग्णाची केंद्रीयदृष्टी मंदावते.

वाचताना किंवा लिहिताना फार मंदप्रकाशात काम करू नये. त्यासाठी पुरेसा स्वच्छ प्रकाश असला पाहिजे अन्यथा डोळ्यांना शीण येतो, डोळे दुखतात, काम थांबवावेसे वाटते. बाह्य वातावरण प्रदूषणाने खराब झालेले असते. या वातावरणाचा डोळ्यांना उपद्रव होतो.

वातावरणातील सूक्ष्म धूलिकण, जंतू, विषाणू, धुरळा या आदी गोष्टींचा नेत्रत्वचेशी संपर्क होताच डोळे लाल होणे, चुरचुरणे, पाणी व चिकटा येणे वगैरे उपद्रव सुरू होतात. दीर्घ पल्ल्याचा प्रवास करून येताच आपणास हे उपद्रव जाणवतात.

निगा डोळ्यांची ( भाग 1)   निगा डोळ्यांची ( भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)