कात्रज विषबाधा प्रकरण : अन्न पुरविणाऱ्या संस्थेवर बंदी

पुणे – कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना झालेल्या विषबाधा प्रकरणी शाळेसह शहरातील 23 शाळांना मध्यान्ह पोषण आहार पुरवठा करणाऱ्या रजनी महिला विविध कार्यकारी संस्थेला तत्काळ व्यवसाय बंदचे आदेश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त संजय शिंदे यांनी दिली.

रामभाऊ म्हाळगी शाळेत बुधवारी सकाळी मध्यान्ह पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना दिलेल्या खिचडीचे सॅम्पल राज्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. यानंतर अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कोंढव्यातील किचनला भेट देऊन पाहणी केली. यावेळी किचनमध्ये अस्वच्छता आढळली. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार अशा संस्थेत तयार होणाऱ्या अन्नपदार्थांचे निरीक्षण करण्यासाठी टेक्‍नीकल स्टाफची नियुक्‍ती करणे गरजेचे आहे.

मात्र, संस्थेकडे टेक्‍नीकल स्टाफ नसल्याचे समोर आले. यासह इतर काही तरतुदीचे उल्लंघन झाल्याने संस्थेला व्यवसाय थांबवण्याचे आदेश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्‍त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्‍त संजय शिंदे, अन्न व सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.