कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; 23 वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक – कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची रस्त्याकडेला असलेल्या दुध डेअरीच्या भिंतीला धडक बसून भीषण अपघात झाला. ही घटना त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावरील अंजनेरी शिवारातील तुपादेवी फाट्यावर मंगळवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. अपघातात चालक सुरज प्रकाशसिंग परदेशी (वय-23, रा. नाशिकरोड) याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज त्र्यंबकेश्वर येथील नातेवाईकांना भेटून परत आपल्या घरी नाशिकरोड येथे जात होता. यावेळी कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या डेअरीच्या भिंतीवर धडकली. कारमध्ये सुरज एकटाच होता. अपघातात तो जबर जखमी झाला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सुरजच्या पश्चात एक भाऊ आहे. आई-वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले होते. दोघे भाऊ मावशीकडे रहात होते. अपघातग्रस्त गाडीदेखील मित्राची असल्याची माहिती आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.