चंद्रपूर – तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना पिंपळनेरी-खापरी मार्गावर घडली आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आई-वडिलांसह मुलीचा समावेश आहे. मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. सायत्रा मोतीराम मेश्राम (65) कमल चुनारकर (45) आणि मोतीराम मेश्राम (70) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर उत्तम चुनारकर (45) व अंकित राजू मेश्राम (10) हे दोघे जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खापरी धर्मू येथील चुनारकर आणि मेश्राम हे दोन्ही कुटुंबीय चारचाकी वाहनाने तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. या भिषण अपघातात मायलेकीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर जखमी अवस्थेत असलेले वडिल मोतीराम मेश्राम यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.