चोवीस बाय सात सेवा उपलब्ध
पुणे – ऑनलाइन व्यवहाराला चालना देण्यासाठी बचत खातेधारकांनी एनईएफटी अर्थात नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर यंत्रणेद्वारे पाठवलेल्या रकमेला जानेवारीपासून विनाशुल्क करण्याचे रिझर्व्ह बॅंकेने अगोदरच जाहीर केले आहे. आता ही सेवा अहोरात्र म्हणजे आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सोमवारपासून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना या यंत्रणेद्वारे कधीही पैसे पाठवता येऊ शकणार आहेत. यासाठी आवश्य ती भांडवल सुलभता रिझर्व्ह बॅंकेने उपलब्ध केली आहे.
बॅंकांच्या नियमित कामकाजानंतर हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग म्हणजे एसटीपी ही पद्धत वापरली जाणार आहे. सध्याची एनईएफटी पद्धत जशी चालवली जात आहे, त्याच पद्धतीने अहोरात्र चालणारी पद्धतही राबवली जाणार आहे. यासाठी बॅंकांचे रिझर्व्ह बॅंकेकडे जे चालू खाते असते त्या खात्यामध्ये या बॅंकांनी पुरेशी रक्कम वेळोवेळी ठेवावी, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या होत्या. आता रिझर्व्ह बॅंकेने अशा बॅंकासाठी आवश्यक ती भांडवल सुलभता उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. बॅंकांना तांत्रिक तयारीसाठी आणि ही सेवा उपलब्ध होणार आहे, हे ग्राहकांना सांगता यावे याकरिता आठवड्याभराचा कालावधी देण्यात आला होता.
8 तासांत झाले 11.40 लाख व्यवहार
या यंत्रणेंतर्गत पहिल्या आठ तासांत तब्बल 11.40 लाख व्यवहार झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. देशातील केवळ काही मोजक्याच देशात एनईएफटी अहोरात्र चालू आहे. उद्योजकांना निधीचे वेळी-अवेळी हस्तांरण करता यावे याकरता ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात उद्योग करणे अधिक सुलभ होणार आहे. रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार डिजिटल पेमेंट व्यवस्था आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.