कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांनाही लवकरच ‘सातवा वेतन’

पुणे – केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होण्याची शक्‍यता आहे. नोव्हेंबरमध्ये यासंदर्भातील अधिकृत घोषणा होणार आहे, मात्र वेतनामधील फरकाची असलेली रक्‍कम लागलीच मिळणार नसल्याचे बोर्ड प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केंद्र शासनाने जानेवारी महिन्यापासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मागील 4 महिन्यांपूर्वी हा वेतन आयोग लागू करण्यात आला. इतकेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही 2 महिन्यांपूर्वी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांना वेतनामधील फरकाची रक्‍कम सुद्धा देण्यात आली आहे. मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या 10 महिन्यांपासून सातवा वेतन आयोगापासून वंचित आहेत. आधीच जीएसटी कराचा वाटा न मिळाल्याने डबघाईला आलेल्या बोर्डातून मासिक वेतन मिळणे कठीण झाले असताना, सातवा वेतन आयोग लागू होईल की नाही याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, कर्मचाऱ्यांची ही चिंता लवकरच काहीअंशी दूर होणार असल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आवश्‍यक असलेला प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो पुढील कार्यवाहीसाठी प्रिन्सिपल डायरेक्‍टर विभागाकडे पाठविण्यात आला आहे. प्रिन्सिपल डायरेक्‍टर विभागातील अधिकारी वेतन आयोग लागू करण्याबाबत विचारविनियमय करीत आहेत.

या विभागाची नोव्हेंबर महिन्यात वेतन लागू करण्याबाबत परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर लागलीच वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. मात्र, बोर्डाच्या आर्थिक स्थितीमुळे वेतनामधील फरकाची असलेली रक्‍कम लागलीच देणे शक्‍य होणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.