पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आठ वॉर्डांसाठी फेब्रुवारीत होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत संरक्षण मंत्रालयाकडून अद्यापर्यंत अधिकृत निर्देश न आल्याने बोर्डाची निवडणूक लांबणार की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे देशभरातील सध्याच्या कॅन्टोन्मेंट बोर्डांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासहित देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांचा कार्यकाळ फेब्रुवारीत पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन बोर्डाच्या निवडीसाठी फेब्रुवारीत कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र, संरक्षण विभागातर्फे निवडणुकांबाबत अद्याप कोणतेही निर्देश न मिळाल्याने निवडणुका लांबणार असल्याची चर्चा बोर्डातील लोकप्रतिनिधींमध्ये होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी बोर्ड प्रशासनाने संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण मालमत्ता विभाग यांच्या आदेशानुसार मतदार याद्या अद्ययावत करून मागासवर्गीय व महिला आरक्षण याबाबतचा अहवाल पाठवला आहे. डिसेंबरमध्ये 24 तारखेपर्यंत पुढील सूचना प्राप्त होणे अपेक्षित असताना, त्याबाबत कुठलेही निर्देश प्राप्त झाले नाही. कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा 2006 मधील तरतुदीनुसार निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम 55 दिवसांचा असतो.
राज्यातील बारावीच्या परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक होते. मात्र, अद्याप निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर न झाल्याने वेळेत निवडणुका घेणे सद्यस्थितीत दिसून येत नाहीत. त्यामुळे 27 फेब्रुवारी 2020 रोजी मुदत संपणाऱ्या येथील कॅन्टोन्मेंट बोर्डासह देशातील इतर कॅन्टोन्मेंट बोर्डांना कायद्यातील तरतुदीनुसार सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याचे संकेत आहेत.