सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्टीकरणानंतर उमेदवार संभ्रमात
नेट, सेट, टीईटीसाठी हे आदेश लागू होणार का?
पुणे – आरक्षण फक्त प्रवेशासाठी असून, पात्रता परीक्षेसाठी कोणतेही आरक्षण लागू होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. त्यावरून आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट), शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) या पात्रता परीक्षेला आरक्षण लागू राहणार आहे की नाही? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय विद्यालयातील शिक्षक होण्यासाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) उत्तीर्ण होणे आहे. ही परीक्षा 7 जुलै रोजी होत आहे. सीबीएसईने 23 जानेवारी 2019 रोजी या परीक्षेबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंतु, या परीक्षेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या 10 टक्के आरक्षणाचा उल्लेख नव्हता. सीटीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना 10 टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली.
ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि “पात्रता परीक्षेसाठी कोणतेही आरक्षण लागू होणार नाही,’ असे सांगितले. याचिकाकर्त्यांनी विनंती केल्यानंतर या विषयावर दि. 16 मे रोजी न्यायालयाने सुनावणी ठेवली आहे. त्यादिवशी पात्रता परीक्षेवरून सर्व संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. देशात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सेट, नेट परीक्षा घेतली जातात. या पात्रता परीक्षा आहेत. प्रत्येक राज्यात असलेल्या आरक्षणानुसार सेट परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्रात 52 टक्के मागासवर्गीय आणि 48 टक्के खुला संवर्ग असे आरक्षण आहे. त्यात आता 16 टक्के मराठा आरक्षणाची नव्याने तरतूद आहे. राज्यात आता 68 टक्के आरक्षण आहे. संबंधित राज्यातील आरक्षणानुसार सेटचा, तर केंद्रीय स्तरावरील आरक्षणानुसार नेटचा निकाल जाहीर केला जातो. मात्र पात्रता परीक्षेला आरक्षण लागू नसेल, असे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर सेट, नेट परीक्षेलाही हा नियम लागू होणार असल्याची साशंकता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. राज्यात टीईटीला आरक्षण लागू आहे. राज्यात 52 टक्के आरक्षण, 3 टक्के अपंग आणि उर्वरित खुला गट असे आरक्षण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार टीईटी परीक्षा घेतली जाते आणि त्याचा निकाल जाहीर केला जातो. मात्र, पात्रता परीक्षेला आरक्षणावरून आता नवा निर्णय हाती आला आहे. त्यामुळे सीटीईटी परीक्षेच्या याचिकेवरून दिलेल्या न्यायालयाच्या निर्णयावरून टीईटी परीक्षेलाही आरक्षण लागू होणार की नाही, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.