खासदार डॉ. सुजय विखे यांची उपस्थिती
राहुरी – राहुरी तालुका विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आज पक्षाचे वतीने त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्याकडे दाखल केला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, ऍड. सुभाष पाटील, राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार आदी मान्यवर त्यांचे समवेत होते. त्या निमित्ताने आमदार कर्डिलेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आज सकाळी त्यांनी कुलस्वामिनीचे दर्शन घेतले.
राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अर्ज दाखल झाल्यानंतर विजय संकल्प मेळावा पांडुरंग लॉंन्स मध्ये झाला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कर्डिले विखे युती अभेद्य आहे. ईडी चौकशीचा उल्लेख करुन ते म्हणाले, ज्यांनी शेतकरी, सहकार यांना लुटले त्यांची काळजी आपण कशाला करायची. या दोन वर्षात हे सर्व लुटारु जेलमध्येच दिसतील.
नगर जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस हद्दपार करायची आहे. ऍड. सुभाष पाटील, राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, शिवाजी सागर आदींची यावेळी भाषणे झाली. नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी आपण पक्षाबरोबरच असून आमदार कर्डिलेंच्या मागे ठामपणे उभे आहोत असे सांगितले. डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मित्रपक्षासह कार्यकर्त्यांनी तालुक्यातून एकच गर्दी केली होती.