मुंबई : शेतकरी कर्जमाफीची माहिती देणाऱ्या वेबलिंकवर कॅंडीक्रश हा गेम सुरु होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला होता. शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील हलगर्जीपणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेत याप्रकरणी सहकार आयुक्त सतिश सोनी यांना निलंबित केले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा केली होती. कर्जमुक्तीचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सहकार विभागाकडून वेबलिंक तयार करून शेतकऱ्यांना पाठविण्यात आली होती. या वेबलिंकवर कॅंडीक्रश हा खेळ सुरु होत असल्याने सरकारवर टीका झाली होती.
या प्रकाराची गंभीर दखल घेत सरकारने ही कारवाई केली आहे. सतिश सोनी यांनी या योजनेचे गांभीर्य न ओळखता हे काम केले. सोनी यांनी केलेली ही चूक अनवधानाने नाही तर हेतुपुरस्सर केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही सहकार विभागाने म्हटले आहे.