Maharashtra Assembly Elections 2024 : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने सत्यशील शेरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शेरकरांच्या उमेदवारीची घोषणा केली.
उमेदवारी जाहीर होताच सत्यशील शेरकर यांनी महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
शेरकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि जुन्नरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शिवजन्मभूमीच्या भूमीवर विकासाचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
शेरकर यांच्या या उमेदवारीमुळे जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद वाढली असून, त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधताना येणाऱ्या निवडणुकीत विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.