बारामती – देशात कर्करोग होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यास त्यांना जीवदान मिळू शकते, ही बाब विचारात घेत वाराणसी व मुंबईच्या धर्तीवर बारामतीतही सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात टाटा ट्रस्टने तयारी दर्शविली आहे. यासंदर्भात अजित पवार यांच्याशीही बोलणे झाले असून जागेच्या उपलब्धतेनंतर याबाबत टाटा ट्रस्टशी पुढील बोलणी आम्ही करू, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
बारामती रेल्वे स्थानकाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेटदिल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष देशपांडे मंगळवारी (दि. 17) बारामतीत आले होते, त्यावेळी त्यांच्याशी हॉस्पिटलबाबत चर्चा केली असून ते यासाठी सकारात्मक आहेत.
दरम्यान, या हॉस्पिटलसाठी किमान 30 एकर जागेची गरज आहे. ही जागा मिळाल्यानंतर टाटा ट्रस्टच्या मदतीने असे हॉस्पिटल उभारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. या संदर्भात सकाळीच मी अजित पवार यांच्याशीही बोलले असून बारामतीत जागा मिळवून देण्यासाठी त्यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण भागात कर्करोगाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना दिलासा देण्यासह कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे व लोकांचा जीव वाचावा अशीच या मागची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.