सातारा – वडूज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारावर असलेला राग अन् त्यावर होत नसलेली कारवाई यातून गैरसमज निर्माण झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, त्याअगोदरच वडूजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व उपोषणाचा इशारा दिलेल्या कार्यकर्त्यांच्यात इतर सामाजिक कार्यकर्त्यानी दिलजमाई घडवून आणल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती शिंदे व गोडसे यांनी माध्यमांना दिली.
याबाबत अधिक माहित अशी की, वडूज पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले हवालदार मारेकर यांच्याबाबत शहरातील लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले होते. त्याला वाचा फोडण्यासाठी शिंदे व गोडसे यांनी वडूज पोलीस ठाण्याचे मारेकर व त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करून पोलीस ठाण्याच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला होता.
मात्र, या सगळ्या गोष्टी गैरसमाजातून झाल्याचे लक्षात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बाबा शिंदे, बाळासाहेब पोळ, विजय गोडसे, पत्रकार प्रशांत जाधव यांनी पोलीस प्रशासन व उपपोषणाचा इशारा दिलेले कार्यकर्त्यांच्यांत बैठक लावून विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली. तेव्हा शिंदे व गोडसे यांनी झाले गेले विसरून केवळ गैरसमाजतून झालेल्या तक्रारी मागे घेण्याचा शब्द देताना मारेकर यांच्यावर कारवाई करण्याचा शब्द सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्याकडून घेतला व उपोषण करणार नसल्याची ग्वाही प्रशासनाला दिली.