सुट्ट्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळून आल्याने सूचना
पुणे – सुट्ट्या दुग्धजन्य पदार्थांत भेसळ आढळून येत आहे. त्यामुळे पॅकेजड दुग्धजन्य पदार्थ विक्रीला चालना देण्यासाठी अशा पदार्थावरील जीएसटी रद्द करण्याची सूचना करण्यात आली आहे.
ही सूचना राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि मानांकन प्राधिकरणाने (एफएसएसएआय) केली आहे. याबाबत “एफएसएसएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन कुमार अग्रवाल म्हणाले, सध्या पॅकेजड दुग्धजन्य पदार्थावर 5 टक्के जीएसटी लागतो. यातून पळवाट काढण्यासाठी सुट्ट्या स्वरुपात दुग्धजन्य पदार्थ विकण्याचा मार्ग विक्रेत्यांनी काढला आहे.
मात्र, याच्या चाचण्या घेतल्या असता त्यामध्ये बरीच भेसळ आढळून येत आहे. त्यामुळे पॅकेजड दुग्धजन्य पदार्थावरील 5 टक्के जीएसटी रद्द केल्यानंतर अशाप्रकारच्या विक्रीला चालना मिळेल व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल, असे अग्रवाल यांनी सांगितले.
दुग्धजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात लहान मुलांकडून केला जात असल्यामुळे या पदार्थांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. याकरिता “एफएसएसएआय’ने राज्यांना अशा पदार्थांची चाचणी करणारी उपकरणे उपलब्ध केली आहेत. देशभरात 25 लाख इतके दुग्धजन्य पदार्थ विक्रेते आहेत. त्यांचे जास्त प्रमाण पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ भेसळमुक्त असावेत यासाठी आगामी काळात एक मोठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
त्यांतर्गत 25 लाखांपैकी 1 लाख विक्रेत्यांची चाचणी घेतली जाणार आहे. ही मोहीम एक-दीड महिन्यांत सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विक्रेत्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, सध्या तरी त्यातील केवळ 5 टक्के लोकांनी नोंदणी केली आहे.
या विक्रेत्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर त्यांना छायाचित्र असलेले ओळखपत्र देण्यात येईल व लॅक्टोमीटर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्नाच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना कराव्या याकरिता त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.