इचलकरंजीसाठीची सुळकुड पाणी योजना रद्द करा; शेतक-यांची मागणी

कोल्हापूर/ प्रतिनिधी: इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित सुळकुड पाणी योजनेला गट-तट बाजूला ठेवून सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही योजना रद्द होईपर्यंत नेटाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. ही योजना रद्द करण्यासाठी पाठिंबा व पुढाकार घेण्यासाठी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांना या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे साकडे घातले.

शिरोळ, हातकणंगले, करवीर ,राधानगरी, भुदरगड व कागल या सहा तालुक्यातील शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन समरजितसिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले.

यावेळी घोसरवाडचे नंदकुमार नाईक म्हणाले, काळम्मावाडी धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. आम्हाला अजून पाणी पुरत नाही .तरीही हे पंचगंगा प्रदुषित करून दूध गंगेतील पाणी मागत आहेत. ते आम्ही कदापिही देणार नाही. वारणे वरून योजना का झाली नाही? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे.

दत्तवाडचे माजी उपसरपंच राजगोंडा पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील नऊ गावांच्या पिण्याच्या व पाच गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही.
दिंडनेर्लीचे विलास पाटील म्हणाले, वारणेच्या शेतकऱ्यांचा विरोध बघून दूधगंगेवर ही योजना रेटण्याचा प्रयत्न हाणून पाडू या.
निगवे खालसा तालुका करवीर येथील विलास कांजर म्हणाले, एका जाणकार मंत्र्याने लोकभावनेचा विचार न करता आम्हा लाभार्थ्यांवर ही योजना लादण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला ठामपणे विरोध करूया.

सावर्डे खुर्द तालुका कागल येथील प्रताप पाटील म्हणाले, कालव्याची कामे अजून अपूर्ण आहेत. कालवा धारकांवर अन्याय होणार आहे. आता कुठे हिरवाई डोलणा-या या भागाचे पण वाळवंट होण्यापासून वाचवण्यासाठी या योजनेला कडाडून विरोध केल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत.

आनंदराव पाटील म्हणाले, भविष्यात दूधगंगा वेदगंगा काठच्या लोकांना उपसा बंदीचा धोका असून पिके वाळून करपून गेल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी आत्ताच जागे होऊन विरोध करूया .

कसबा सांगावचे विक्रमसिंह माने म्हणाले, गटतट न पाहता या आंदोलनात सहभागी होऊया. व हा डाव हाणून पाडून आमच्या हक्काच्या पाण्यासाठी गावोगावी शेतकर्‍यांच्या मध्ये जागृती करूया यावेळी बापुसो शेटे, आनंदा डाफळे एम डी कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रास्ताविक बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील यांनी केले अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले.


…. तर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन

यावेळी नागाव तालुका करवीर येथील रंगराव तोरसकर म्हणाले, पाटबंधारे खात्याचे अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पाण्याबाबत दिशाभूल करणारी आकडेवारी व अहवाल शासनास सादर करण्याची शक्यता आहे. दूधगंगा -वेदगंगा काठावरील शेतकऱ्यांच्या लोकभावना जाणून घेऊन त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा. अन्यथा त्यांच्या घरावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढन्यात येईल असा इशारा दिला.

छायाचित्र- कोल्हापूर येथे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांना सुळकुड योजनेच्या शेतकऱ्यांच्या बाजूने नेतृत्व करण्यासाठीचे साकडे निवेदनाद्वारे घालताना सहा तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.