अहमदाबाद – भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील उर्वरीत सामने रद्द करा अन्यथा आत्महत्या करीन, अशी धमकी एका व्यक्तीने दिली आहे.
येथील चांदखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी केव्ही पटेल यांना दूरध्वनीवरून ही धमकी देण्यात आली असून दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचे नाव पंकज पटेल असल्याचे सांगितले जात आहे.
गांधीनगरमधून दूरध्वनीवरून आपण बोलत असून राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील उर्वरीत सामने रद्द करा अन्यथा मी आत्महत्या करेन अशी धमकी त्याने दिली आहे. पंकज पटेल हा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा पथकातच कार्यरत आहे.
या धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेसाठी प्रेक्षकांना काही प्रमाणात परवानगी देण्यात आली होती. पण नियमांचे पालन होत नसल्याचे संबंधीत व्यक्तीने म्हटले होते.
चांदखेडा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध कलम 505(2), 507, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, करोनाचा धोका वाढल्यामुळे या मालिकेतील उर्वरीत दोन लढतींसाठी प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे.