ई-निविदा प्रक्रिया रद्द करा

ग्रामपंचायतींनी लॉकडाऊन कालावधीत राबविलेली

नगर  -जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती अंतर्गत व पंचायत समिती अंतर्गत लॉकडाऊन काळात झालेल्या ई निविदांची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने केली आहे. याबाबत निवेदन देवूनही कार्यवाही न झाल्याने संघटनेने सोमवारी (दि.1)जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारासमोर लाक्षणिक उपोषण केले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे, शुभम दांगट, ताराचंद राऊत, सचिन खंडागळे, कृष्णा गागरे, अक्षय झिने, महेश चव्हाण आदी सहभागी झाले होते. लॉकडाऊन काळात तांत्रिक अडचणी, स्टॅम्पची अनुपलब्धता अशा अनेक कारणांनी अनेकांना इच्छा असूनही ई निविदा भरणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर या सर्व निविदा प्रक्रिया पुन्हा राबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ई निविदेचे वेगवेगळे नियम व अटी तसेच इतर विविध अफरातफरी बाबत संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडे निवेदन देवून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सर्व निविदांची चौकशी करून तसेच नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीसाठी नियम अटी सारख्या प्रकारच्या ठेवण्याबाबत तोंडी आश्वासन देण्यात आले होते. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून प्राप्त होणाऱ्या ई निविदांच्या तक्रारीचे निरसन करण्यात येईल असे देखील तोंडी कळवण्यात आले होते.

मात्र, असे असताना लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या ई निविदा प्रक्रिया पूर्वी प्रमाणे मनमानी पद्धतीने व वेगवेगळ्या नियमावलीने राबविण्यात आल्या. लॉकडाऊन कालावधीत झालेली ई निविदा कामे एवढी तातडीची होती का असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या सर्व ई निविदा रद्द करून पुन्हा ई निविदा प्रक्रीया राबवावी.

Leave A Reply

Your email address will not be published.