साध्वी प्रज्ञासिंहची उमेदवारी रद्द करा – माजी सरकारी अधिकाऱ्यांची मागणी 

नवी दिल्ली – देशभरातील ७१ माजी सरकारी अधिकाऱ्यांनी एका खुल्या पत्राद्वारे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरची लोकसभा निवडणुकांमधील उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच साध्वी प्रज्ञासिंहने, ‘महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळेच झाला’ असं विवादित वक्तव्य केलं होतं. साध्वीच्या वक्तव्यानंतर देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठली होती.

दरम्यान आता याच पार्श्ववभूमीवर देशभरातील ७१ माजी सरकारी अधिकाऱ्यांनी साध्वी प्रज्ञासिंहची आगामी लोकसभा निवडणुकांमधील उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी करत एक पत्र लिहिले असून त्याद्वारे ते म्हणतात, “मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूरने राजकीय व्यासपीठाचा वापर करत आपले कट्टरतावादी विचार पसरविण्याचा प्रयत्न तर केलाच परंतु आपल्या वक्तव्याद्वारे तिने कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या हेमंत करकरे यांचा अपमान देखील केला.”

“साध्वी प्रज्ञासिंहने केलेलं वक्तव्य हे आपल्या कार्यतत्परतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्याचा घोर अपमान असून साध्वीचे वक्तव्य ऐकून आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. भारतीय जनतेने हेमंत करकरे यांचे बलिदान स्मरून अशा क्रूर विचारसरणीच्या लोकांना करकरेंचा अपमान करण्यापासून रोखायला हवं.”

हे पत्र लिहिणाऱ्या ७१ माजी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलियो रिबेरियो, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकर यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.