नेवासा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रत्येक गावात आणि बुथवर संबंधित बीएलओ नोंदणी प्रक्रिया राबवत आहेत. सन २०१९ मधील नेवासा विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत चौदा हजार मतदार मयत तसेच दुबार व बोगस असल्याचे निदर्शनात आलेले होते. यामुळे नेवासा विधानसभा मतदार संघाची छबी ही राज्यामध्ये मलीन झालेली होती. याबाबत आपणास लेखी पत्र देऊन तक्रारही दिलेली होती त्यानंतर तपासणी मोहीम राबवून,या पैकी सात हजार बोगस नावे वगळण्यात आलेली आहेत.
त्यामुळे आमच्या असे निदर्शनास आलेले आहे की, निवडणुकीची भीती असणारे काही संभाव्य उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी पुन्हा बोगस मतदार नोंदणी करून घेत आहेत. हा अक्षम्य गुन्हा आहे. त्याचे परिणाम प्रामाणिक काम करणाऱ्या मतदारांना आणि इतर उमेदवारांना भोगावा लागणारा आहे. नेवासा तालुक्यात असे काही शिक्षणसम्राट आणि साखर कारखानदार हे त्यांच्या यंत्रणेचा गैरवापर करून त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेण्यासाठी नेवासा मतदार संघाबाहेरून आलेल्या विद्यार्थी अन् त्यांच्या पालकांना धाक दाखवून नेवासा तालुक्यातील विविध बूथवर मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची सक्ती करत आहे. त्यासाठी बीएलओ वर दबाव आणला जात आहे. शिक्षणासाठी विद्यार्थी म्हणून आलेल्या व्यक्तींचे नाव नेवासा विधानसभा मतदार यादीमध्ये घेण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
कारण ही व्यक्ती फक्त तीन ते चार वर्षासाठी या ठिकाणी आलेली असते आणि येथील स्थानिक प्रश्नांची त्याना कुठलीही जाण नसते. तसेच काही राजकीय पुढऱ्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नेवासा तालुक्याबाहेरील जवळच्या नातेवाईकांची नांवे नेवासा मतदार यादीत समाविष्ठ करून घेण्यासाठी बीएलओवर दबाव आणत आहे. त्यासाठी खोटे पुरावे तयार केले जात आहेत. जर एखादी व्यक्ती तालुक्याबाहेरची असूनही तीने नेवासा तालुक्यात मतदार नोंदणी केल्याचे आढळल्यास आम्ही या विषयावर प्रत्येक मतदार नोंदणी केंद्रावर तक्रार – हरकत दाखल करणार आहोतच अशा हरकतीची संख्या वाढली तर आम्ही न्यायालयात जाऊन याविषयी संबंधित बीएलओ आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रतिवादी करून खटला दाखल करणार आहोत.
तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन दिल्याप्रमाणेच आम्ही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना निवेदन देणार आहोत. तरी यामध्ये आपण लक्ष घालून मतदार यादीमध्ये अशा प्रकारे मयत तालुक्याबाहेरील रहिवाशी यांचे बोगस नाव नोंदणी करुन घेणाऱ्या बीएलओ यांना मार्गदर्शन करून नेवासा तालुक्यात मूळ निवास नसणाऱ्या व्यक्तींचे मतदान नोंदवून घेण्यास मनाई करावी त्यासाठी खास तपासणी मोहीम राबवावी आणि नोंदणी प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून लोकशाहीचे रक्षण करावे अशी मागणीही पेचे यांनी केली आहे. यासंदर्भात नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे
नेवासा तालुक्यातील मयत,दुबार व बोगस मतदार नोंदणी बाबत संबंधित बीएलओ यांना सूचना देणे बाबत जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी तहसीलदारांना व निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी निवेदन दिले. यामध्ये जिल्हाधिकारी नगर,मुख्य निवडणूक आयुक्त. राज्य निवडणूक आयोग मुंबई यांना निवेदन देण्यात आले.