पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सलग दुसऱ्या दिवशीही अनेक खासगी रुग्णालयांनी “अपॉइंटमेंट’ “कॅन्सल’ करून पुन्हा चार दिवस पुढची तारीख अनेकांना दिली आहे. काही जणांना खासगी रुग्णालयांनी कॉल करून तशी सूचना केली आहे.
“कोव्हॅक्सिन’ आणि “कोविशिल्ड’चा गोंधळ होऊ नये, यासाठी महापालिकेने स्वत:च्या एकूण लसीकरण केंद्रांपैकी 11 ठिकाणी या दोन्ही लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. उपलब्धता लक्षात घेता, केवळ दुसरा डोस ज्यांचा कोविशिल्डचा आहे त्यांनाच तो दिला जाणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले होते.
त्यानुसार येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालय, लायगुडे रुग्णालय, नामदेवराव शिवरकर रुग्णालय, अण्णासाहेब मगर रुग्णालय, बालाजीनगरमधील धनकवडे रुग्णालय, केएचएन रुग्णालय, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून, मालती काची रुणालय, भानगिरे रुग्णालय, डॉ. नायडू रुग्णालय येथे दोन्ही लसी देण्याला सुरूवात केली आहे.
सध्या उपलब्ध लसींचा विचार करता खासगी रुग्णालयांनी “सेल्फ मॅनेजमेंट’ करायला सुरूवात केली आहे. ज्या लाभार्थींनी खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना रुग्णालय प्रशासनामार्फत कॉल करून त्यांना पुढील दोन दिवसांच्या “अपॉइंटमेंट’ दिल्या जात आहेत.