ओटावा – कॅनडाचे खलिस्तानवाद्यांवरील प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. खलिस्तानवर उघडपणे टीका करणे हिंदू खासदार चंद्र आर्य यांना महागात पडले आहे. त्या देशातील सत्ताधारी लिबरल पक्षाने त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई केली आहे. खलिस्तान समर्थक असल्याचे सांगितले जाणारे ट्रुडो यांच्या पक्षाने त्यांचे तिकीट रद्द केले आहे.
कॅनेडियन हिंदू खासदार चंद्र आर्य म्हणाले की, लिबरल पक्षाने पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. कॅनडामधील खलिस्तानी कारवायांचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखले जाणारे ६२ वर्षीय चंद्र आर्य हे तीन वेळा खासदार राहीले आहेत आणि २०१५ पासून ते ओटावामधील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
लिबरल पक्षाच्या राष्ट्रीय मोहिमेचे सह-अध्यक्ष अँड्र्यू बेवन यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांना हा निर्णय कळवण्यात आला. जवळपास दोन महिने आधीच आर्य यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ट्विटरवर आर्य यांनी शेअर केलेल्या पत्रात म्हटले आहे की पक्षाच्या ग्रीन लाईट कमिटी कडून मिळालेल्या नवीन माहितीमुळे, प्रचार सह-अध्यक्षांनी त्यांचा उमेदवार म्हणून दर्जा रद्द करण्याची शिफारस केली आहे.