टोरांटो – कॅनडामधील शीख नेते आणि पंजाबी वंशाचे व्यापारी रिपुदमन सिंग मलिक यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना कॅनडातील सरे येथे गुरुवारी मध्यरात्री उशीरा घडली. कारमधून जात असताना काही अज्ञातांनी त्यांची कार रोखून त्यांच्यावर गोळीबार केला. यात रिपुदमन मलिक यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी नंतर त्यांची कार पेटवून दिली.
1985च्या कनिष्क बॉम्बस्फोट प्रकरणात रिपुदमन सिंग मलिक यांचे नाव समोर आले होते. मात्र 2005 मध्ये त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मात्र गुरुवारी रात्री कॅनडातील सरे शहरातील 128 अँड 82 चौकात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकरी कारमधून आले होते. यावेळी काही अंतरावर कार पार्क केली आणि नंतर दुचाकीवरून ते पुढे आले. हत्या केल्यानंतर आरोपींनी कार पेटवून दिली. पुरावे नष्ट करण्यासाठी कारला आग लावल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, रिपुदमन सिंग हे कॅनडाचे यशस्वी उद्योजक तसेच शीख संघटनांचे प्रतिनिधी होते. 1985 मध्ये एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करून त्यात स्फोट घडवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मॉन्ट्रियलहून नवी दिल्लीला येणाऱ्या विमानात हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या दुर्घटनेत 329 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात रिपुदमन सिंग 2005 पर्यंत कॅनडात तुरुंगात होते आणि नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. रिपुदमन सिंग हे आधी खलिस्तानचे समर्थक होते. पण नंतर त्यांची विचारधारा बदलली. शेवटच्या क्षणापर्यंत ते शीख समाजातील लोकांना फुटीरतावादी नेत्यांपासून दूर राहण्याची प्रेरणा देत राहिले.
रिपुदमन सिंग यांची हत्या कट्टरवाद्यांनी केल्याचा संशय आहे. खलिस्तानच्या विचारसरणीपासून दूर जाऊन ते कॅनडातील धर्मांधांना भारत सरकारच्या दिशेने जागृत करत होते, असे सांगितले जात आहे. रिपुदमन सिंग मलिक श्रीगुरू ग्रंथ साहिब छापून प्रसिद्धीच्या झोतात आले.