ओटावा – कॅनडामध्ये कोविड लसीकरण अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशभर भडकलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान डस्टीन ट्रुडो आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञात ठिकाणी रवाना झाले आहेत. आंदोलकांनी संसदेवरच मोर्चा काढल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव ट्रुडो आणि त्यांच्या कुटुंबीयांना अज्ञात ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.
अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी करोना लसीकरण अनिवार्य केले गेले आहे. त्याशिवाय करोनाविषयक निर्बंधांच्या निषेधार्थ हजारो ट्रक चालकांसह नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले आहे.”फ्रिडन कॉनव्हॉय’ नावाच्या या आंदोलनाची सुरुवात गेल्या आठवड्यात पश्चिम कॅनडामध्ये झाली. व्हॅन्कुवरपासून राडधानीच्या दिशेने हजारो ट्रकचा मोर्चा निघाला. काल या आंदोलनाचे लोण राजधानी ओटावापर्यंत पोहोचले.
अमेरिका आणि कॅनडाने जानेवारीच्या मध्यापासूनच सीमा ओलांडणाऱ्या ट्रक चालकांसाठी करोना लसीकरण सक्तीचे केले आहे. मात्र तेंव्हापासून ट्रक चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कॅनडातील 90 टक्के चालकांचे लसीकरण झालेले आहे, असे ट्रुडो यांनी 26 जानेवारीला म्हटले आहे. ज्या ट्रक चालकांकडून असंतोष व्यक्त केला जातो आहे, ते कॅनडाचे प्रतिनिधीत्व करत नाहीत असा दावाही ट्रुडो यांनी केला आहे.
राजधानीमध्ये ट्रक चालकांचा मोर्चा थडकल्यामुळे आता तेथे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संसदेच्या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे रुप प्राप्त झाले आहे. संसदेच्या परिसरातील प्रवेश आठवड्याच्या अखेरच्या दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. आंदोलक संसदेच्या परिसरात सोमवारीही ठाण मांडून बसून राहतील असा ओटावा पोलीस प्रमुखांचा अंदाज आहे.