हडपसर उपनगर वार्तापत्र : विवेकानंद काटमोरे
हडपसर परिसरातील शासकीय कर्मचाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रयत्न केले. खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जनजागृती करून करोना आटोक्यात आणला. त्यानंतर लस उपलब्ध झाली अन् सर्वसामान्यांचा जीव भांड्यात पडला. अनलॉक झाले, मात्र सर्व विसरून नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने नागरिकांच्या बेफिकिरीतूनच करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्वयंशिस्त बाळगून काळजी घेतली नाही, तर हिच बेफिकिरी जीवघेणी ठरेल. हडपसरकरांनी वेळीच सावध होऊन हे लक्षात घ्यायला हवे.
करोनाचे संकट कायम असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मास्क न वापरता बिनधास्त फिरत आहेत. विवाह सोहळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी होत आहे. मांजरी उपबाजार आणि हडपसर बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गाडीतळ बस थांबा, गांधीचौक, मगरपट्टा चौक, उड्डाणपुलाखाली थुंकी बहाद्दर वाढले आहेत. चहाचे ठेले आणि छोट्या हॉटेलमध्ये अपेक्षेप्रमाणे काळजी घेतली जात नसल्याचे उघडपणे दिसते. व्यवस्थापन काळजी घेत असले तरी नागरिक त्याला जुमानत नाहीत. मास्क, हा तोंडाच्या हनुवटीवरील “शोपीस’ झाला आहे. पुन्हा गळाभेट घेऊन शेकहॅन्ड केले जाते, प्रत्येका सोबत असणारा सॅनिटायझर आता दिसत नाही. हिच ती बेफिकरी.
यापूर्वी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका पातळीवरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. महापालिका अधिकारी, शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली. परंतु, गेल्या पंधवड्यात हडपसर परिसरात करोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या भागात सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे 18 हजार करोना रुग्ण आढळले आहेत. त्यात साडेसतरा हजार रुग्ण बरे झाले तर 330 जणांनी जीव गमवला आहे. आता, 500 रुग्ण ऍक्टिव असून रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या भागात करोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी वाढणारी गर्दी याला कारणीभूत ठरत आहे. बाजारात विक्रेते मास्क न लावता दुकाने लावत आहेत तसेच नागरिकही कोणतीही काळजी न घेता बाजारात गर्दी करीत आहेत. करोना हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर शासकीय यंत्रणांनी देखील कारवाई करावी. प्रत्येकाने आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा हडपसर परिसरात करोनचा उद्रेक केंव्हा होईल हे सांगता येत नाही. ही बेफिकीर जीवघेणी ठरू शकते, हे लक्षात घ्या.