न्यूयॉर्क – भांग हा शब्द उच्चारला की लगेच डोळ्यासमोर गुंगी आणणारा आणि धुंदी आणणारा एक अमली पदार्थ येतो पण अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाप्रमाणे हीच भांग आता करोनावरील उपचारासाठी प्रभावी ठरणार आहे. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्याचे महत्त्वाचे काम भांग करत असल्याचे लक्षात आल्याने आगामी कालावधीमध्ये करोनाच्या लसीमध्ये भांगेचा वापर करण्याचा विचारही सुरू झाला आहे.
जर्नल ऑफ नॅचरल प्रॉडक्ट या नियतकालिकांमध्ये याबाबतचा एक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला असून जंगलात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाऱ्या भांगेच्या वनस्पतींचा वापर करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी होऊ शकतो असा दावा त्यात करण्यात आला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कॅनबिस सेतीवा या प्रकाराच्या भांगेच्या मुळांमध्ये असा एक मूलद्रव्य आहे ज्याच्या आधारे या विषाणूंचे संक्रमण रोखणे शक्य होणार आहे.
यापूर्वी लेथब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांनीही या प्रकारचे संशोधन केले असून त्यांनी असाच दावा केला आहे. अमेरिकेतील ग्लोबल इनोवेशन सेंटर आणि कॉलेज ऑफ फार्मसी यांनी संयुक्तपणे याचे संशोधन केले असून याबाबत सविस्तर लेख या जर्नलमध्ये प्रसिद्ध केला आहे. भांगेच्या रोपांमध्ये सापडणारे कॅनाबिगोरेलीक ऍसिड आणि कॅनाबीडीओलिक ऍसिड हे घटक करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
भांग हा जरी अमली पदार्थ असला तरी या उपचारांमध्ये मानवाच्या मेंदूवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही अशी खात्रीही या वैज्ञानिकांनी दिली आहे. नजीकच्या कालावधीमध्ये करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लस उत्पादनासाठी भांगेचा वापर करण्याचा विचार काही औषध कंपन्यांनी सुरू केला आहे. शरीरात अँटीबॉडी विकसित करण्यासाठी भांगेच्या गुणधर्माचा वापर होऊ शकतो असे संशोधकांना वाटत आहे.