प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावणार

मतदानासाठी प्रशासन सज्ज ः राज्यात 96 हजार 661 मतदान केंद्र
21 ऑक्‍टोबर रोजी मतदान
मुंबई :विधानसभा निवडणूकीसाठी गेल्या दोन आठवड्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता राजकिय पक्षांच्या प्रचार सभा, रॅलीचा धुमधडाका सुरु असून आरोप-प्रत्यारोपांनी राजकिय मैदान तापले आहे. शनिवार, 19 ऑक्‍टोबर रोजी राजकिय पक्षांच्या प्रचाराच तोफा थंडावणार असून सोमवार, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार आहे. लोकाशाहीच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून राज्यात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

विधानसभा निवडणूकीसाठी 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होत असून 24 ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी राज्यातील पुरूष, महिला व तृतीयपंथी व दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट), तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

दिव्यांगांना सुविधा
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5 हजार 400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत केली आहेत. तसेच पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.