परवान्याविना शेकडो वाहने प्रचारात

मावळ लोकसभा ः केवळ 14 वाहनांचे परवाने; 21 उमेदवार रिंगणात

पिंपरी – दोन जिल्ह्यात विस्तारलेला, सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला भला मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या मावळ लोकसभा मतदासंघातून आतापर्यंत प्रचारासाठी केवळ 14 च वाहनांचे परवाने घेण्यात आले आहेत. तब्बल 21 उमेदवार रिंगणात असताना केवळ 14 वाहनांना परवाने घेतल्याने प्रचारात बिगर परवाना धारक अनधिकृत वाहनांचा भरणा असल्याचे समोर आले आहे. निवडणूक विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्व सामान्यांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी आणि चिंचवड या विधानसभांमध्ये मतदार संख्या अधिक असली तरी क्षेत्रफळ कमी आहे. दुसरीकडे उर्वरीत चार विधानसभा क्षेत्रांचा विस्तार खूप मोठा आहे. मावळात आणि रायगड जिल्ह्यातील भाग हा दुर्गम असून विस्तार खूपच मोठा आहे. मुख्य राजकीय पक्षांसोबत अपक्ष व अन्य स्थानिक पक्षांचे उमेदवार असे एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत. ही परिस्थिती पाहता केवळ 14च वाहनांसाठी उमेदवारांनी परवाने मिळवले आहेत. विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत जाणार असून हळूहळू प्रचारासाठी वाहनांची संख्याही वाढणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ मोठा असल्याने विविध पक्षांनी प्रचार यंत्रणाही राबविली आहे. मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यत पोहचण्यासाठी प्रत्येक पक्षांचे कार्यकर्ते विविध माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहेत. मावळ लोकसभा मतदासंघात मतदारांची संख्या मोठी असून या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांना वाहनांची परवानगी घ्यावी लागते.

या परवानग्या निवडणूक कार्यालयातून घेतल्या जातात. निवडणूक प्रचारासाठी सर्वच पक्षांकडून वाहनांची परवानगी घेण्यात येते. यादरम्यान, वाहनांच्या परवानगीची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी निवडणूक विभागाने लोकसभा व विधानसभानिहाय परवानगी दिलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून वाहनांना परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा परवाना दोन प्रकारचा आहे. त्यामध्ये, ज्या पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी संपूर्ण लोकसभा मतदार संघात प्रचार करणार आहेत, अशांना लोकसभा मतदारसंघापुरता व विधानसभा मतदारसंघात प्रचार करणाऱ्यांना विधानसभा मतदारसंघापुरता परवाना दिला जात आहे.

प्रचारातील प्रत्येक वाहनांवर पथकांची नजर मतदारसंघात प्रचारयंत्रणा राबविताना विविध वाहनांचा वापर केल जात आहे. यामध्ये, डिजिटल माध्यम, विविध पक्षांचे रथ, रिक्षांवरती स्पीकर, फलक आदी प्रकारच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. यावेळी, निवडणूक पथक प्रचारातील प्रत्येक बाबींचे चित्रीकरण करुन तपासणी करत आहे. तसेच, प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर निवडणूक विभागाने स्थापन केलेल्या पथकांची करडी नजर आहे. प्रचारात वापरणाऱ्या सर्व वाहनांचे व प्रचाराचे चित्रीकरण प्रशासनाकडून केले जात आहे.

कारवाईचा बडगा उगारणार

मावळ लोकसभा मतदार संघात प्रत्येक पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता वाहनांना परवाने दिले जात आहेत. यावेळी, वाहनांना परवानग्या देताना निवडणूक आयोगाने कार्यक्षेत्र ठरवून दिले आहे. प्रचारादरम्यान एखादे वाहन लोकसभा व विधानसभेच्या (परवानानिहाय) कार्यक्षेत्राबाहेर गेल्याचे आढळून आल्यास संबंधित पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे, निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रचारासाठी वाहनांची संख्या कमी

मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान शेवटच्या टप्यात म्हणजे 29 एप्रिलला होणार आहे. यामुळे, मतदारसंघात अजून दहा दिवस प्रचाराचे रण सुरु राहणार आहे. मावळ मतदारसंघ मोठा असूनही मतदारांपर्यत पोहचण्यासाठी अद्यापपर्यत केवळ 14 वाहनांनी परवानग्या घेतल्या आहेत. मात्र, शेवटच्या आठवडाभरात प्रचाराचा जोर वाढणार असल्याने वाहनांची संख्याही वाढण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.