प्रचाराचा पारा वाढला

खा. उदयनराजे, नरेंद्र पाटील यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फेरी 

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाची तारीख जवळ येत असताना प्रचाराचा पारा वाढताना दिसून येत आहे. आघाडीचे उमेदवार खा.उदयनराजे अन महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी मतदार संघामध्ये प्रचाराची पहिली फेरी जवळपास पुर्ण केली आहे. मात्र, प्रचार फेरीमध्ये दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोप अन टिका-टिप्पणीमुळे निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे.

खा.उदयनराजेंची कॉलर उडविण्याच्या स्टाईलवरून नरेंद्र पाटील यांनी टीका केली. कॉलर उडवून मतदारसंघाचा विकास होतो का, असा प्रश्‍न देखील त्यांनी निर्माण केला. तर नुकतेच खा.उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांच्या पिळदार मिशीवरून टीका केली. मिशी पिळून नव्हे तर कर्तृत्वाने पुरूषार्थ सिध्द होत असतो. अशा शेलक्‍या शब्दात खा.उदयनराजेंनी पाटील यांना टोला लगावला. एवढेच काय तर, नरेंद्र पाटील यांच्या मातोश्रींची भेट घेवून त्यांनी खळबळ उडवून दिली. साहजिकच त्यामुळे अस्वस्थ झालेले पाटील यांनी खा.उदयनराजेंच्या दहशतीच्या मुद्दयावर प्रहार करत जिथे बोलवाल, तिथे येण्याचे आव्हान देवून टाकले. त्याचबरोबर खा.उदयनराजे यांनी पाच वर्षात खासदार निधी केला नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. त्या आरोपाला खा.उदयनराजे यांनी थेट जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचे लेखी पत्र सादर करून उत्तर दिले.

सगळ्या धुराळ्यात नुकतीच भर ना.चंद्रकांत पाटील यांनी टाकली. वाई येथील सभेत खा.उदयनराजेंना पाडण्याचा आत्मविश्‍वास कार्यकर्त्यांमध्ये जागा केला. एवढेच काय तर चंद्रकांत पाटील यांनी मायक्रो प्लॅनिंग व्दारे बारामतीसह साताऱ्याची जागा पटकविण्याचा चंग बांधलेला दिसून येत आहे. पाटणमध्ये आ.देसाई यांच्यापासून मदन भोसले, अतुल भोसले, मनोज घोरपडे, दिपक पवार, महेश शिंदे यांना चार्ज करण्याचे काम ना.पाटील करताना दिसून येत आहेत. तर खा.उदयनराजेंसाठी ना.पाटील यांच्याप्रमाणे आ.शशिकांत शिंदे समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. राज्याचे कॉंग्रेसचे नेते असलेले आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण व उत्तर पुरते मर्यादीत राहणे पसंत केले आहे. अशा सर्व स्थितीत खा.उदयनराजे प्रचारात एकच गोष्ट सांगत आहेत की, ही माझी नव्हे तर विद्यमान आमदारांची निवडणूक आहे. त्यामुळे आपसुकच आमदारांचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून पळत आहेत आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर देताना दिसून येत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.