#लोकसभा2019 : सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचाराला रंग

गाणी, व्यंगचित्रांच्या माध्यमातून उमेदवारांवर शरसंधान

मंचर – लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला रंग भरु लागला आहे. सोशल मीडियावर निवडणुकीची धूम मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. उमेदवाराच्या समर्थकांनी विविध प्रकारची गाणी, व्यंगचित्रे तयार करुन समोरील उमेदवारावर शरसंधान साधले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनात कोणता खासदार याविषयी फेसबुक, व्हॉट्‌सऍप, युट्‌यूब या माध्यमातून नवनवीन पोस्ट टाकून उमेदवाराचे समर्थक मते जाणून घेत आहेत. या माध्यमातून सोशल मीडियावर शाब्दिक चकमक उडून उमेदवारांच्या समर्थकांमध्ये भांडणे होताना दिसून येत आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना आणि मित्र पक्षाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे.

लोकसभेचे वातावरण निर्मिती करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून परिवर्तन यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संवाद यात्रेच्या माध्यमातून सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवनेरी ते वढू तुळापूर याठिकाणी विजयी चौकार यात्रा रॅलीचे आयोजन केले होते. तसेच मतदार संघातही झंझावती दौरे सुरु आहेत.

माझा उमेदवार किती योग्य आहे याची सविस्तर माहिती फेसबुकवर दिली जात आहे. काही कोपरा सभांचे फोटो व्हॉट्‌सअप आणि फेसबुकवर टाकुन त्याला गर्दी नसल्याचे दाखविले जात आहे. उमेदवारांचे समर्थक फेसबुक, व्हॉट्‌सअप आणि युट्यूबवर विविध पोस्ट टाकून माझा उमेदवार किती चांगला आहे, हे आवर्जून सांगताना दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.