“दी एम्पायर’ नावाच्या वेबसीरिजला तीनच दिवसांपूर्वीपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या वेबसीरिजमध्ये बाबराचे उदात्तीकरण करण्यात आल्याच्या आरोपातून या वेब सीरिजला सोशल मीडियातून विरोध व्हायला लागला आहे.
एरव्ही या वेब सीरिजबाबत फार आरडाओरड झालीही नसती. मात्र, बॉलीवूडचे एक दिग्दर्शक कबीर खान यांना तर मोगलच खरे “राष्ट्र निर्माता’ असल्याचा साक्षात्कार झाला. मोगल आणि मुसलमान शासक यांना खलनायक दाखवणे, हे चिंताजनक वाटते, असे ते म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्याचा परिणाम म्हणून अनेक संघटनांनी “दी एम्पायर’ला विरोध करायला सुरुवात केली आहे. विशेषतः अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू असताना, मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या बाबराच्या जीवनावरील वेब सीरिज प्रदर्शित करण्याला विरोध होणारच होता.
तालिबानी विचारसरणीला साह्य करणाऱ्या कबीर खानला धडा शिकवण्यासाठी त्याच्या आगामी सर्व चित्रपटांवर, तसेच क्रूर बाबराचे उदात्तीकरण करणारी “दी एम्पायर’ वेब सीरिज दाखवणाऱ्या “डिस्ने-हॉटस्टार’वर बहिष्कार घालावा, असे आवाहन काही संघटनांच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले आहे. मात्र, आपल्याला बाबराचे उदात्तीकरण करायचे नसून “भारत एक खोज’ आणि “पद्मावत’सारखा सिनेमा बनवायचा होता, असे डायरेक्टर मिताक्षप कुमार यांनी म्हटले आहे.