विभागीय आयुक्तांनी घेतली पक्ष आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक
पुणे – मतदार नोंदणीसाठी अंतिम मुदत 6 नोव्हेंबर 2019 असून या कामात राजकीय पक्षांसह शिक्षक संघटनांनी सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी केले.
पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यंदाचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्यानेच मतदार यादी करावयाची असल्याने प्रत्येकाने नव्याने मतदार नोंदणी करावी, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदारनोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व पक्षांचे आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध पक्षांचे, शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतदार नोंदणी कार्यक्रम
मंगळवार दि. 1 ऑक्टोबर 2019 – मतदारनोंदणी सूचना प्रसिद्ध
बुधवार दि. 6 नोव्हेंबर 2019 – मतदारनोंदणी अर्जांवरील दावे, हरकती स्वीकारण्याची अंतिम मुदत.
मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2019 – हस्तलिखिते तयार करणे, प्रारुप मतदार याद्यांची छपाई.
शनिवार दि.23 नोव्हेंबर 2019 ते सोमवार दि. 9 डिसेंबर 2019 – दावे, हरकती स्वीकारण्याचा कालावधी.
गुरूवार दि. 26 डिसेंबर 2019 -दावे, हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे, छपाई करणे.
सोमवार दि. 30 डिसेंबर 2019 – मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी.
पदवीधर मतदारासाठीची अर्हता
व्यक्ती भारताची नागरिक तसेच त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवाशी.
दि. 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी पदवी अथवा त्याच्याशी समकक्ष असलेली शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती.
शिक्षक मतदारासाठीची अर्हता
व्यक्ती भारताची नागरिक तसेच मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी
दि. 1 नोंव्हेंबर 2019 च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षांमध्ये किमान तीन वर्ष कालावधीत माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कामाचा अनुभव.