मुंबई – ‘दिल चाहता है’, ‘मिशन काश्मीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेली अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनालीने महिलांच्या वाढत्या डिमांडिंग स्वभावाबाबत आणि मुलांवरील वाढत्या दबावाबाबत सांगितले आहे. तसेच तिने या व्हिडिओत महिलांना ‘आळशी’ देखील म्हंटलं आहे.
एकीकडे या व्हिडिओला नेटकऱ्यांचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे सोनालीला खूप ट्रोल केले जात आहे. तिच्यावर अनेक नकारात्मक टीकांचा भडीमार सुरु झाला आहे. मात्र, आता यावरून मोठा वाद झाल्याने अखेर सोनालीने एक पत्र जाहीर करत सर्वांची माफी मागितली आहे. सध्या तीच हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “या घटनेतून मी खूप काही शिकले..’, असंही तिने या पोस्टच्या अखेरीस लिहिलं आहे.
— sonalikulkarni (@sonalikulkarni) March 18, 2023
सोनाली म्हणाली की…, “मला मिळत असलेल्या प्रतिक्रियांमुळे मी भारावून गेले आहे. मी संपूर्ण प्रेस आणि मीडियाचे आभार मानू इच्छिते, ज्यांचं माझ्याशी अत्यंत परिपक्व आचरण पहायला मिळालं. मी स्वत: एक स्त्री असल्याने इतर महिलांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. उलट स्त्री असणं म्हणजे काय, याबाबत मी वारंवार व्यक्त झाले आहे. माझं कौतुक करण्यासाठी किंवा माझ्यावर टीका करण्यासाठी वैयक्तिकरित्या माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे..’ असं तिने लिहिलं.
सोनाली व्हिडिओमध्ये काय म्हणाली वाचा….
“भारतातील अनेक मुली आळशी आहेत… त्यांना असा बॉयफ्रेंड किंवा नवरा हवा आहे ज्याची नोकरी चांगली आहे, ज्याच्याकडे घर आहे… ज्याच्या पगार चांगला आहे. पण तू माझ्याशी लग्न करून मी काय करीन हे सांगण्याची हिंमत त्या मुलीत नाही. मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे की, तुमच्या घरात अशा महिला निर्माण करा, ज्या सक्षम असतील. जे स्वतःसाठी कमवू शकतात…. जे म्हणू शकतात की हो आम्हाला नवीन फ्रीज घ्यायचा आहे, तुम्ही अर्धे पैसे द्या, मी अर्धे पैसे देईन. मी भांडणाबद्दल बोलत नाही, पण त्याच्यात इतकी क्षमता असली पाहिजे..’ असं ती म्हणाली होती.