राजकीय विरोधकांना ‘देशद्रोही’ संबोधणे भाजपची संस्कृती नाही : अडवाणींचा मोदींना टोला?

राजकीय विरोधकांना ‘देशद्रोही’ संबोधणे भाजपची संस्कृती नाही : लालकृष्ण अडवाणी

भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी येत्या ६ एप्रिल रोजी असलेल्या भाजप स्थापना दिनानिम्मित्ताने एका ब्लॉगद्वारे देशातील जनतेला तसेच भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगद्वारे भाजपसोबत काम करताना त्यांना आलेले अनुभव लोकांसमोर मांडले आहेत. आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच त्यांनी गांधीनगर येथील जनतेचे आपल्याला १९९१पासून ६ वेळा निवडून दिल्याबाबत आभार मानले आहेत.

आपल्या ब्लॉगद्वारे त्यांनी, “भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्य ही विविधतेमध्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आहेत. भाजपच्या स्थापनेपासून आपण आपल्या मतांशी भिन्न मतं असणाऱ्यांना कधीच आपला शत्रू मानलं नसून आपण त्यांना केवळ वैचारिक मतभेद असणारे मानलं आहे तसेच आपल्या राजकीय विचारांशी विसंगती असणाऱ्यांना आपण कधीच ‘देशद्रोही’ ठरवलं नसून आपला वैयक्तिक तथा राजकीय विविधतेमध्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये पूर्णपणे विश्वास आहे.” असं म्हंटल असल्याने हा अडवाणींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष वार तर नाहीये ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांमुळे प्रचारसभांची रणधुमाळी सुरु असून भाजप देखील जोरदार प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांकडून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर थेट पाकिस्तानशी संबंध असल्याचे आरोप लावण्यात येत आहेत. काल गोंदिया येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर त्यांच्या जाहीरनाम्यावरून आरोप लावताना, “देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देणारा काँग्रेसचा जाहीरनामा हा पाकिस्तानच्याच कटाचा भाग आहे.” असं वक्तव्य केलं होत.

आता याच पार्शवभूमीवर लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगद्वारे आपल्या राजकीय विचारांशी मतभिन्नता असणाऱ्यांना ‘देशद्रोही’ संबोधणे आपली संस्कृती नसल्याचं म्हंटल्याने अडवाणींचं आपल्या ब्लॉगवरील वक्तव्य पंतप्रधानांना आणि एकंदरीतच भाजपच्या निवडणूक अजेंड्याला चपराक लावणारं असल्याचं मानलं जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.