पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड लिंक रोडवरील एसबीआय बॅंकचे एटीएम फोडल्याचा कॉल पोलिसांना आला आणि धावाधाव झाली. मात्र बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे नसल्याने एटीएम मशिनचा दरवाजा उघडा ठेवल्याचे दिसून आले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. गेल्या काही दिवसांमध्ये एटीएम आणि सराफांच्या दुकानांना चोरट्यांनी टार्गेट केल्याने पोलिसही धास्तावले आहेत.
चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पिंपरी चिंचवड लिंक रोडवरील गावडे पेट्रोल पंपावरील एमटीएम फोडल्याचा कॉल एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षास केला. त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एटीएम मशिनचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. याबाबत अधिक चौकशी केली असता शेजारी एटीएम मशिनच्या सुरक्षा रक्षकाने याबाबत पोलिसांना अधिक माहिती दिली.
एटीएम मशिनमध्ये पैसे नसल्याने तसेच ती नादुस्त असल्याने बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी मशिनचा दरवाजा उघडा ठेवला. तसेच एटीएम बंद असल्याचे नागरिकांना सांगा असे शेजारच्या एटीएमच्या सुरक्षा रक्षकास सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून एटीएम मशिनचा दरवाजाचा उघडा आहे.
याबाबत बोलताना भीमराव शिंगाडे म्हणाले, “”एटीएमच्या सुरक्षिततेबाबत बॅंकांना यापूर्वीच पत्र दिले आहे. मात्र एसबीआय बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएम मशिनचा दरवाजा उघडा ठेवल्याने निष्काळजीपणा केला आहे. याबाबत बॅंकेला पत्र देण्यात येणार आहे.”