जागतिक पथकालाच बोलवा…, मोडलेल्या रस्तादुभाजकांची करू द्या पाहणी

येरवडा – येरवडा प्रभाग क्रमांक-6 डेक्कन कॉलेजजवळील स्व. बिंदुमाधव ठाकरे चौक ते हजरत शाहदवल बाबा दर्गापर्यंत रस्तादुभाजक मोडून पडला आहे, अशा प्रकारचा दुभाजक जगात कोठेही नसल्याने या दुभाजकाची पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेने एखाद्या जागतिक बांधकाम कंपनीच्या पथकास विशेष आमंत्रण द्यावे, अशी उपरोधिक चर्चा नागरिक करू लागले आहेत.

या रस्त्याच्या रुंदीकरणासह रस्ता सिमेंट कॉंक्रीट करून अनेक वर्षे झाली असली तरी मोठ्या उंचीचे रस्तादुभाजक टाकण्याचे काम तसेच रेंगाळले आहे. रस्तादुभाजकाचे तुटलेले सिमेंटचे ब्लॉक इतरत्र पसरले असून या ब्लॉकमुळे अनेक अपघात घडले आहेत.

हा रस्ता वर्दळीचा असून नगर-सोलापूर रस्त्याकडे जाणारी अनेक मोठी-मोठी अवजड वाहने तसेच चारचाकी, दुचाकी वाहने येथून भरधाव असतात. दुभाजकासाठी ठेवलेले हे सिमेंटचे ब्लॉक तुटलेले व गाड्यांच्या धुरामुळे काळपट पडले आहेत. रात्रीच्यावेळी हे ब्लॉक दिसत नाहीत. यातून भीषण अपघातही घडले आहेत.

स्व.बिंदुमाधव ठाकरे चौक ते हजरत शाहदवल बाबा दर्गापर्यंत रस्त्याची पाहणी करण्यात येईल. तसेच, तुटलेल्या दुभाजकाबाबत पथविभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांना याबाबतच्या सूचना पत्राद्वारे करण्यात येतील. याकामी योग्य ती कार्यवाही तातडीने करू.
– संजय भोसले, नगरसेवक 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.