नांदेड : मद्यप्रेमी लोकांच्या घशाची कोरड आजपासून म्हणजेच शनिवारपासून दूर होणार आहे. शासनाने मान्यता दिल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांकडून घरपोच दारू देण्याच्या प्रक्रियेला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हिरवा कंदील दाखवला आहे. सकाळी १० ते ५ या वेळेत सीलबंद विदेशी दारू, वाईन आणि बियर खरेदीसाठी इच्छुकांकडून ऑर्डर घेऊन डिलिव्हरी बॉय मार्फत परवाना असलेल्या व्यक्तींना दारू घरपोच दिली जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही विक्रेत्याला देशी दारू विकता येणार नाही किंवा घरपोच देता येणार नाही.
कोरोना प्रादुर्भावामुळे 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. जिल्ह्यातील देशी, विदेशी मद्यविक्री तसेच बिअरची दुकाने तेव्हापासूनच अघोषित काळासाठी बंद होती. दारू ही सवय आणि गरज ज्यांची बनली त्यांच्यासाठी हा काळ खूप कठिण गेला. नेहमीप्रमाणे उद्यापासून दुकान बंद राहील, असा कोणताही फलक लागला नाही आणि अचानक दुकाने बंद झाल्याने स्टॉक किंवा अन्य व्यवस्था करणाऱ्यांचे मागच्या दोन महिन्यात मोठे हाल झाले.
शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी ही वस्तू असल्यामुळे लॉकडाऊन शिथिल करताना दारू विक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला. परंतु, नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागल्याने सोशल डिस्टंसिंगचा नियम मद्यप्रेमींनी गुंडाळून ठेवल्याचे अनेक ठिकाणी पुढे आले. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये सुरू केलेली दुकाने बंद करावी लागली.
दिल्लीसह काही राज्यांमध्ये ऑनलाईन नोंदणी करून घरपोच दारू पुरवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी 16 मे पासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी याबाबतचे सविस्तर आदेश काढले आहेत.