नगर : शंभर वर्षे जुन्या असलेल्या व मोडकळीस आलेल्या इमारतीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाचा कारभार अद्यापही सुरू आहे. सात कोटीची नवी इमारत चांदणी चौकानजीक बांधून तयार असताना केवळ फर्निचरचा कामाअभावी आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर रखडले आहे. वाहनासंबंधी महत्वपूर्ण कामकाज करणाऱ्या विभागाचा कारभार सध्या जीव जोखमीत टाकून सुरू आहे.
आरटीओ कार्यालयासाठी आकारास आलेल्या नूतन इमारतीमध्ये गृह्प्रवेशाची मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे. नागरिक व व्यावसायिकांच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन विभाग अनेक महत्त्वांच्या कामासाठी महत्त्वाचा मानला जातो. वाहन चालक परवाना, वाहनांचे पासिंग, टेस्टिंग व अन्य महत्त्वाच्या कामांसाठी उपप्रादेशिक परिवहनची भूमिका महत्त्वाची असते. वाहनासंबंधी असणारी विविध कामे याच कार्यालयामार्फत मार्गी लावली जातात. आर्थिक सुबत्तेचा स्तर वाढला, तशी वाहनांची संख्या देखील वाढली. त्यामुळे उप प्रादेशिक परिवहन विभागाचा कारभार देखील विस्तारला.
सध्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचा कारभार एसपी चौकाजवळील जागेतून सुरू आहे. आरटीओ कार्यालयात सध्या 17 अधिकारी व 45 कर्मचारी नियुक्त आहेत. अनुबंधानुसार अनेक पदे रिक्त आहेत. एकीकडे कामाचा वाढता पसारा आणि मनुष्यबळ कमी यामुळे त्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाभरातील वाहनांच्या चाचणी परवान्यांचा व्याप सांभाळावा लागत आहे. ज्या जागेत हे कार्यालय सुरू आहे, ती इमारत शंभर वर्ष जुनी इमारत आहे. कौलारू लाकडी बांधणी व मातीच्या भिंती असलेल्या या इमारतीची सध्याची अवस्था आहे.
मागील दीड वर्ष चांदणी चौकालगत प्रादेशिक परिवहनसाठी नवी सोयी, सुविधेनीयुक्त अशी आकर्षक वास्तू उभी राहिली आहे. इमारतीचे काम पूर्ण झाले असून, केवळ फर्निचरची कामे होणे बाकी आहे. 2012-13 ला या इमारतीसाठी जागा हस्तांतरीत करण्यात आली. सप्टेंबर 2014 ला मान्यता मिळाली. नंतर कार्यारंभ मिळाले. 2015 ला प्रत्यक्ष निधी उपलब्ध होण्यास सुरवात झाली. 2015 मध्येच नव्या इमारतीचे कामकाज सुरू झाले. चार वर्षांत सप्टेंबर 2019 मध्ये इमारतीचे काम पूर्ण झाले.
दरम्यान तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नगर दौऱ्यावर असताना ऑगस्ट 2019 मध्ये नव्या इमारतीचे उद्घाटन केले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी काही दिवस कामकाज पूर्ण नसताना उद्घाटन करण्यात आले. त्याला पाच महिन्याचा कालावधी होत आला आहे.
मात्र, अद्याप स्थलांतर झालेले नाही. या कार्यालयाचे स्थलांतर नूतन इमारतीमध्ये तत्काळ होणे गरजेचे आहे. तीन मजली इमारत, अधिकारी-कर्मचारी वर्गाकरिता स्वतंत्र दालने, अभ्यागतासाठी बैठक व्यवस्था, 250 मीटरचा ब्रेक टेस्टिंग ट्रॅक, चारही बाजूने साडेसातशे मीटर रस्ता, दोन हजार स्केअर मीटरचे वाहनतळ, विजेच्या बाबतीत स्वयंपूर्णतेसाठी सोलर सिस्टिम, आग प्रतिबंधात्मक उपाययोजने करिता 75 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, कार्यालयीन कर्मचारी, नागरिकांसाठी 25 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, नागरिकांसाठी शौचालयची सुविधा, प्रशासकीय विभाग, भाडोत्री, खासगी वाहन विभाग आणि लायसन्स आणि परवाने, लष्काराच्या संबंधित स्वतंत्र कक्ष, कामकाजासाठी आधुनिक सोयी या इमारतीत राहणार आहेत.